पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धरून टोनी ह्यांचे आई-वडील लेबनॉनला पळाले. तिथेच टोनी ह्यांचा जन्म झाला. तिथून ते कुवेतला गेले व तेथील पोस्टात नोकरीला लागले. कुवेत त्यावेळी ब्रिटिश नियंत्रणाखाली होता व तेथील पोस्टखाते ब्रिटिश पोस्टखात्याशी जोडलेले होते. तिथूनच त्यांना युपीयुमध्ये १९६५ साली नोकरी लागली. शरद जोशी तिथे यायच्या आधी तीन वर्षे. दोघेही 'थर्ड सेक्रेटरी' ह्याच श्रेणीत होते. आपल्या पत्नीसह टोनी आजही त्याच घरात राहतात; जिथे सात वर्षे जोशी त्यांचे शेजारी होते. टोनी म्हणत होते,
 "आम्ही दोघेही पहिल्या-दुसऱ्या दिवसापासूनच एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारू लागलो. शरद कामावर रुजू झाला तेव्हा त्याची बसायची केबिन व माझी केबिन शेजारीशेजारीच होती. मी ह्या नव्या इमारतीत फ्लॅट घेतल्याचं ऐकल्यावर त्यानेही ह्याच इमारतीत फ्लॅट घ्यायचं ठरवलं. अगदी शेजारचाच फ्लॅट. आम्ही साधारण एकाच वेळी तिथे शिफ्ट झालो.
 "शरद अतिशय हुशार व कर्तबगार होता. सुमार बुद्धिमत्तेची माणसं त्याला आवडत नाहीत असा साधारण समज ऑफिसात रूढ होता. शिष्ट म्हणूनच त्याची ख्याती होती. याचं कारण थोड्या दिवसांतच मला समजलं. युपीयुमधले अनेक कर्मचारी निम्नस्तरीय श्रेणीतून चढत चढत वर आले होते तर, शरद मात्र इंडिअन पोस्टल सर्विस ह्या उच्च श्रेणीतच प्रथमपासून राहिला होता. साहजिकच तो इतर सहकाऱ्यांच्या तुलनेत उठून दिसे. पण सुदैवाने आमचे राहायचे फ्लॅट शेजारी शेजारी व कामावर बसायची जागाही शेजारी म्हटल्यावर साहजिकच आमच्यात चांगली मैत्री झाली. आमचं घर ऑफिसपासून मोटारने जेमतेम पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं. ऑफिसात जाता-येताना व दुपारी जेवायला जाता-येताना आम्ही एकत्र जात अस. कधी त्याच्या मोटारीने तर कधी माझ्या मोटारीने.
 "शरद जॉईन झाला त्याच वर्षी आमच्या ऑफिसात एक स्टाफ असोसिएशन सुरू झाली. मी तिचा एक कमिटी मेंबर होतो. बरेच उपक्रम आम्ही राबवत असू. त्या कमिटीत यायची शरदची फार इच्छा होती. पुढल्या वर्षी कमिटीच्या निवडणुकीला तो व मी असे दोन उमेदवार उभे होतो. पडणाऱ्या मतांनुसार पॉइंट्स मोजले जात. एकूण शंभर पॉइंट्स असत. गंमत म्हणजे दोघांनाही सारखी मतं पडली. नियमानुसार पुन्हा एकदा मतदान घेतलं गेलं. त्यावेळी त्याला ५१ व मला ४९ पॉइंट्स मिळाले; कारण माझं स्वतःचं मत मी त्याला दिलं होतं!

 "ऑफिसात आम्ही ब्रेकमध्ये टेबल टेनिस खेळायचो. मला हा गेम खूप आवडायचा व चांगला यायचाही. १९७४च्या सुरुवातीला लोझान येथे युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस भरली होती. तिला मोठं चायनीज डेलेगेशन आलं होतं. प्रथमच. त्यांच्यात व आमच्या आयबी खात्यात शरदने एक टेबल टेनिस स्पर्धा आयोजित केली होती. आम्ही ती जिंकावी अशी त्याची फार इच्छा होती. किसिंजरच्या चायनाभेटीतील पिंगपाँग डिप्लोमसीमुळे त्यावेळी टेबल टेनिस खूप लोकप्रिय झालं होतं. आम्ही स्वतःला चांगलं खेळणारे समजत होतो व आम्ही बऱ्यापैकी प्रॅक्टिसही केली होती, पण चायनीज प्रतिनिधींपुढे आमचा अगदी धुव्वा उडाला! शरद खट्ट झाला होता; त्याला हरणं आवडत नसे."

डोंगरकुशीतल्या नंदनवनात६३