पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भेटू शकतो का?" मी विचारले. कारण योगायोगाने एका सामाजिक संस्थेच्या परिषदेसाठी मला त्यानंतर महिन्याभरातच स्वित्झर्लंडमध्ये जायचे होते. जोशींना ती कल्पना आवडली व त्यानुसार त्याच दिवशी जोशींनी आपल्या त्या एकेकाळच्या सहकाऱ्याला इमेलवरून कळवले व चरित्रलेखनासाठी मला शक्य ती माहिती देण्याची विनंती केली.
 नंतर त्यांच्याशी माझा इमेलवर संपर्क झाला व भेटीचे नक्की झाले. ते बर्न येथे राहत होते. आमचे बाझलजवळ राहणारे एक स्नेही डॉ. अविनाश जगताप हेही मी व माझी पत्नी वर्षा यांच्याबरोबर आले. आपल्या सँडोझमधील नोकरीमुळे ते स्वित्झर्लंडमध्येच स्थायिक झाले असले, तरी जगताप मूळचे पुण्याचे. बहुजनसमाजात शिक्षणप्रसाराचे मोठे काम करणारे त्यांचे वडील प्राचार्य बाबुराव जगताप एकेकाळी पुण्याचे महापौरदेखील होते. आम्ही तिघेही एकत्रच बर्नला गेलो. तिथे जोशी यांच्या त्या माजी सहकाऱ्याला भेटणे ह्या लेखनासाठी महत्त्वाचे ठरले. कारण ह्या आठ वर्षांच्या कालखंडाबद्दल त्यांनी भरपूर माहिती दिली व ती त्यांच्याइतकी खात्रीपूर्वक दुसरा कोणीच देऊ शकला नसता. त्यांचे नाव टोनी डेर होवसेपियां (Tony Der Hovesepian). सोयीसाठी म्हणून यापुढे त्यांचा उल्लेख टोनी असा करत आहे.

 गुरुवार, १२ जुलै २०१२. साधारण सकाळची नऊची वेळ.

 बर्न रेल्वेस्टेशनवरून आम्ही ट्राम पकडली व Weltpost ह्या स्टॉपवर उतरलो. ह्या जर्मन शब्दाचा अर्थ जागतिक पोस्टऑफिस. ठरल्याप्रमाणे टोनी आमची तिथे वाटच पाहत होते. पुढला सगळा प्रवास आम्ही त्यांच्याच मोटारीने केला.
 इथेच युपीयुचे प्रचंड मुख्यालय आहे. ते आम्ही आधी बघितले. युपीयुचे व पूर्वी बर्नमध्येच असलेल्या इंटरनॅशनल टेलेकम्युनिकेशन्स युनियनचे प्रतीक म्हणून स्विस सरकारने सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभारलेली धातूची दोन अप्रतिम शिल्पे बघितली. ही दोन्ही शिल्पे दोन स्वतंत्र चौकांत असून आपल्या मुंबईतील हुतात्मा स्मारकाच्या साधारण चौपट आकाराची आहेत. त्यानंतर आम्ही नॉयेनेग (Neuenegg) ह्या बर्नचे उपनगर म्हणता येईल अशा छोट्या गावात गेलो. इथेच टुल्पेनवेग (Tulpenweg) या रस्त्यावर असलेल्या एका प्रशस्त व सुंदर इमारतीत जोशी आपल्या आठ वर्षांच्या वास्तव्यापैकी सुमारे सात वर्षे राहिले. टोनी यांचा फ्लॅटदेखील त्यांच्या शेजारीच होता. जोशींचा फ्लॅट क्रमांक होता 3C, तर टोनी ह्यांचा 3D तीही जागा आम्ही बघितली.

 टोनी साधारण जोशी यांच्याच वयाचे; कदाचित दोन-चार वर्षांनी लहान असू शकतील. शिडशिडीत आणि उंच. मूळचे आर्मेनिया ह्या युरोप व आशिया यांच्या सीमेवरच्या प्राचीन व पुढे सोविएत संघराज्याचा एक भाग बनलेल्या देशातले. अधिकृत धर्म म्हणून ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करणारे हे जगातले पहिलेच राष्ट्र. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे सुमारे शंभर वर्षांपूर्वी, तुर्की आक्रमकांनी, जवळ जवळ १५ लाख आर्मेनिअन लोकांची अत्यंत क्रूरपणे कत्तल केली. बायका-मुलांनाही त्यांनी सोडले नाही. कसाबसा जीव मुठीत

६२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा