पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जोशींचे कौटुंबिक जीवन कसे होते, हे विचारल्यावर टोनी सांगू लागले,
 "माझी पत्नी थेरेसा व लीला चांगल्या मैत्रिणी झाल्या. थेरेसा ४८ सालची, म्हणजे दोघींचं वयही साधारण सारखं होतं. थेरेसा एका लहान मुलांच्या शाळेत शिकवायची व पुढे तिने स्वतःच एक शाळा सुरू केला. आजही ती तेच काम करते. मुख्यतः वेगवेगळ्य कॉन्स्युलेट्समध्ये काम करणाऱ्यांची मुलं तिथे येतात. लीला मात्र घरीच असे. दोन मुलींना सांभाळणं हेच तिचं पूर्णवेळचं काम होतं. कधी कधी तिला घरी बसून कंटाळा यायचा हे खरं आहे, पण संस्थेच्या नियमानुसार तिला कुठल्याही प्रकारची नोकरी वा व्यवसाय करण्याची परवानगी नव्हती. माझी पूर्वीची नोकरी ब्रिटिश पोस्टखात्यातली होती व मी मूळचा आर्मेनियाचा; ह्या देशात अधिकृत निर्वासित मानला गेलेला. त्यामुळे आम्हाला स्विस नागरिकत्व लगेचच मिळून गेलं व साहजिकच थेरेसाला अर्थार्जन करायची मुभा मिळाली होती. शरदचं नागरिकत्व मात्र भारतीयच होतं. अर्थात युएन संस्थांमध्ये पगार उत्तम मिळायचे; इतर स्विस कंपन्यांपेक्षा व सरकारपेक्षा आमचा पगार निदान ३० टक्के अधिक होता. शिवाय इतरही फायदे खप मिळत. त्यामळे एकाच्याच पगारात घर चालवणं कठीण नव्हतं.
 "जोशींना दोन मुली होत्या, तर आम्हाला लौकरच आमचा पहिला मुलगा झाला. एप्रिल ६९मध्ये झालेला पॅट्रिक, पुढे जोशींच्या दोन मुली व आमचा मुलगा अशी तिघं एकत्र खेळू लागली, एकत्र शाळेत जाऊ लागली. सगळ्यांची शाळा एकच – तेथील इंटरनॅशनल स्कूल. त्यांना शाळेत सोडायचं कामदेखील आम्ही वाटून घ्यायचो; कधी आम्ही तर कधी ते सोडायचे. फिरायला, नाटक-सिनेमा बघायला आम्ही एकत्रच जायचो.

 "शरद ऑफिसात खूप गंभीर व अबोल असे, पण लहान मुलांशी खेळताना तो अगदी लहान होऊन जाई. ऑक्टोबर ७०मधला एक प्रसंग मला आठवतो. आमचे डायरेक्टर जनरल त्यावेळी एक इजिप्शिअन गृहस्थ होते. त्यांनी एकदा मला व थेरेसाला त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. शरद व लीलाला मात्र आमंत्रण नव्हतं. कदाचित मी आर्मेनियन असल्याने, म्हणजे त्यांच्या एकेकाळच्या शेजारी देशातील असल्याने, मला इजिप्शिअन जेवण आवडेल असं त्यांना वाटलं असावं. तेव्हा आमचा पॅट्रिक दीड वर्षांचा होता. डिनरपार्टीला त्याला कुठे नेणार, म्हणून आम्ही त्याला जोशींच्या घरी ठेवायचं ठरवलं. अर्थात त्यांच्या संमतीने. आधी तो खूप रडत होता, त्यामुळे जावं की जाऊ नये अशा संभ्रमात थेरेसा होती. पण शरद व लीला 'अगदी खुशाल जा' असं दोन-तीनदा म्हणाल्यामुळे आम्ही त्याला त्यांच्या घरी ठेवून गेलो. तो राहील की नाही ह्याविषयी आम्हाला खूप धास्ती होती; त्याला असं सोडून जायची ही पहिलीच वेळ. रात्री उशिरा घरी परतलो व काहीशा धाकधुकीतच शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवली. आधी वाटलं होतं, पॅट्रिक झोपला असेल, मग वाटलं तो रडून रडून बेजार झाला असेल आणि शरद-लीलालादेखील त्याने खूप त्रास दिला असेल. पण प्रत्यक्षात लीलाने दार उघडलं, तेव्हा पॅट्रिक चक्क जागा होता व शरद त्याच्याशी अगदी मजेत, हसत हसत खेळत होता. खूप रात्र झाली होती तरी दोघं खेळण्यात इतके दंग झाले होते, पॅट्रिकला त्याने इतका लळा लावला होता, की नंतर आमच्या फ्लॅटमध्ये त्याला परत नेताना तो रडू लागला! शरदचं

६४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा