पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उपरोक्त लेखातच सिंधूताई लिहितात,

शरदचे एक वैशिष्ट्य असे, की इतरांपेक्षा आपले काही वेगळे असावे असे त्याला वाटते. नमाताई व मी गाणे शिकू लागलो व बाळ तबला शिकू लागला. शरदनेही काही शिकावे अशी आईची इच्छा होती. आईला पेटी वाजवता येई. शरदचा आवाज गोड. म्हणून आईने एकदा पेटी वाजवून 'शुभं करोति' म्हणायचे म्हटले, तर शरदने नकार दिला. तेच शिक्षणाचे. 'सर्वांनी काय सायन्स आणि आर्ट्स करायचे, मी कॉमर्स घेणार' असे म्हणून त्याने एमकॉम केले.
(चतुरंग, दैनंदिनी २०१२, पृष्ठ ७५)

 इतरांना खूप अवघड व भावी करिअरच्या दृष्टीने अनपयुक्त वाटणारा संस्कृत विषय त्यांनी घेतला, ज्यांचा अर्थही सगळ्यांना नीट समजत नाही अशा संस्कृत साहित्यात त्यांनी रस घेतला, या साऱ्या संस्कृतप्रेमामागेही निखळ आवडीपेक्षा इतरांपासून काहीतरी हटके, काहीतरी वेगळे करायची इच्छा असावी. "ती एक धुंदीच होती, मस्ती होती. इतरांना ज्या क्षेत्रात रस नाही, त्या क्षेत्रात आपण आकंठ आनंदात बुडून जात आहोत याचा अहंकारही मोठा असावा, असे त्यांनीही स्वतःच्या संस्कृतप्रेमाच्या संदर्भात लिहिले आहे.
 "तू काय, संस्कृतचा प्राध्यापक बनणार," असे एका जवळच्या मित्राने सुचवल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया खूप तीव्र होती. ते लिहितात,

मी? विश्वाच्या निर्मितीतील एक प्रमुख प्रमेय असलेले माझे आयुष्य आणि हा कसेबसे ५४ टक्के मार्क मिळालेला मित्र मला माझी वाट सांगतो आहे? शब्दाशब्दाने वाद वाढला... मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचा निश्चय जाहीर केला. केला म्हणजे केला. 'शेंडी तुटो वा पारंबी तुटो', आता माघार घेणे नाही. तोंडातून निघालेला शब्द मागे घेणे भाग पडून, होणाऱ्या अपमानाने मलिन झालेले जीवन जगण्यात तरी काय अर्थ आहे?

 आपण पुढे काय करणार हे त्या मित्राने गृहीत धरावे याचा त्यांना राग आला होता. पुढे मोठेपणीही आपल्याला गृहीत धरले जाणे (being taken for granted) त्यांना मुळीच आवडत नसे.
 दुसरे विशेष नोंद घेण्याजोगे म्हणजे, आपला निर्णय चुकीचा आहे हे जाणवूनसुद्धा त्यांनी आपल्या निवडीचा पुनर्विचार केला नाही. त्यातही पुन्हा पोद्दार कॉलेजसारखे सर्वसामान्य मराठी मुलाने निवडले असते ते कॉलेज न निवडता, त्यांनी सिडनमसारखे उच्चभ्रू व आपल्या घरापासून दुप्पट अंतरावर असलेले कॉलेज निवडले. ह्या साऱ्यातील हेकटपणा हाही त्या आत्मभानाचा किंवा आत्मविश्वासाचा एक आविष्कार वाटतो.

 पुढे कॉमर्स कॉलेजचे वर्ग सुरू झाले आणि, त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, 'हरियाली' सोडून 'पथरीला' रस्ता स्वीकारणाऱ्याच्या वेदना क्षणाक्षणाला जाणवू लागल्या. पण तरीही

३८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा