पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते त्याच वाटेने पुढे जात राहिले. आपण जे करायचे ठरवतो, त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट उपसायची त्यांची तयारी असायची असेही दिसते. 'की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने' ही सावरकरांची ओळ त्यांची आवडती होती. ही कष्ट सहन करण्याची आत्यंतिक क्षमता हीदेखील त्या तीव्र आत्मभानातून किंवा मनस्वीपणातून येत असावी.
बऱ्याच वर्षांनी ह्या निर्णयाबद्दल जोशींनी लिहिले आहे,

प्राणापेक्षा प्रिय असलेल्या सीतेचाही, राजधर्माचे परिपालन करण्याकरिता, त्याग करायला मी मागेपुढे पाहणार नाही, अशा रामचंद्री अभिनिवेशात मी संस्कृत अभ्यासक्रम न घेण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. वर्षानुवर्षे ज्या आयुष्यक्रमाची तयारी केली, तो क्षणार्धात हेकटपणे लाथाडला. आता पुढे काय? आईवर रागावलेले बाळ हट्ट करून जेवायला नकार देते; त्यामुळे आईचे हृदय पिळवटते आहे, या जाणिवेत त्याला काय आनंद होतो? लव-कुशांनी रामाच्या साऱ्या सैन्याचा पराभव केला, सीतेचे निष्कलंकत्व सिद्ध झाले. तिला कोणी पतिता म्हटले असते, तर लव-कुशांचे पराक्रमसिद्ध धनुष्यबाण आकर्ण ताणून सिद्ध झाले असते. तरीही 'सीतेने पुन्हा एकदा अग्निदिव्य करावे' असा आग्रह धरून रामाने मनातल्या मनात कोणत्या असीम कडूजहर सुखाचा अनुभव घेतला?
(अंगारमळा, पृष्ठ ५१)

 हा परिच्छेद जोशींच्या मनस्वी स्वभावाची व असामान्य भाषाप्रभुत्वाची साक्ष पटवतोच; पण त्यातील अर्थबाहुल्य त्यापलीकडे जाणारे आहे असे जाणवते. 'आईचे हृदय पिळवटते आहे, या जाणीवेत त्याला काय आनंद होतो?' किंवा कोणत्या असीम कडूजहर सुखाचा अनुभव घेतला?' यांसारख्या शब्दरचना काहीशा गूढ वाटतात. 'आपल्या लोकत्तरतेच्या धुंदीत, आपल्या हातानेच आपले आयुष्य कडू करून घेण्यात गोडी मानणारे' हे पृष्ठ २८वर उद्धृत केलेले त्यांचे शब्दही काहीतरी वेगळे सूचित करत आहेत असे जाणवते. पण जोशींनी स्वतः त्याचे नेमके स्पष्टीकरण त्यांच्या लेखनात कुठेच दिलेले नाही.

 प्रखर बुद्धिनिष्ठा आणि तीव्र आत्मभान ही पूर्वायुष्यात जाणवणारी जोशींची दोन व्यक्तिवैशिष्ट्ये व त्यांचे विविधांगी आविष्कार भावी वाटचालीचा मागोवा घेतानाही आपल्याला पुनःपुन्हा जाणवत राहतात.

शिक्षणयात्रा३९