पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा शिक्का मारून फिरत नाहीत. मी महाराष्ट्रीयन आहे; पण मी बसमधून हिंडताना मी मराठी आहे, हे काही बाकीच्यांना ओळखता येत नाही. समजा, उद्या शिवसेनेने मुंबईत काही गडबड केली आणि दिल्लीत मराठी माणसांवर लोक चिडले, तरी मी मराठीच आहे ह्याची जाहिरात नेहमी माझ्याबरोबर नसते. मी दिल्लीमधून त्यावेळीसुद्धा निर्धास्तपणे हिंडू शकतो. शिखांबाबत हे संभवत नाही. बाकी समाजाच्या नजरा आपणाकडे संशयाने पाहताहेत असे त्यांना दरक्षणी जाणवत राहते. अधिक अगतिक आणि म्हणून अधिक अतिरेकी बनत ते इतरांच्यापासून दूरदूर जातात आणि एकमेकांच्या अधिक जवळ येतात. सरदारांचे आजचे आक्रस्ताळी, आततायी वागणे हे असहायतेतून, अगतिकतेतून निर्माण झालेले आहे.

खेड्यापाड्यांतून सारे शीख संतापलेले आहेत हे तर खरेच. पण त्यांचे प्रश्न साधे आहेत. हा मुख्यत्वेकरून शेतीचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न आहे. त्यांना लागणाऱ्या विजेचा प्रश्न आहे. शेतीमालाला मिळणाऱ्या कमी किंमतीचा प्रश्न आहे. शहरातील माणूस कमी कष्टांत अधिक आरामात राहतो हे त्यांना दरक्षणी जाणवते. त्यातून त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांत शहरातील माणसांना, म्हणजे पर्यायाने हिंदूंना, फारसा रस नसल्याने पंजाबमधील आणि भारतातील सारे हिंदू त्यांच्या पिळवणूकीत सामील आहेत असे त्यांना वाटते.

हा प्रश्न या देशातील साध्या-भोळ्या, पिळवणूक होणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळेच पंजाबमध्ये आग पेटलेली असताना, मानाचे मुजरे घेत शरद जोशी आणि त्यांचे साथीदार पंजाबमधून हिंडलेत. शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांविरुद्ध काही करायची हिंमत अकाली दलाचीच काय, पण भिंद्रनवालेचीसुद्धा नव्हती!

(माणूस दिवाळी अंक १९८४)


 शरद जोशी यांनी मांडलेला 'इंडिया विरुद्ध भारत' हा सिद्धांत पंजाबच्या संदर्भात लागू करून पाहिले, तर ह्या तेढीचे स्वरूप बऱ्यापैकी स्पष्ट होते. पंजाबी म्हटले, की बहुतेकदा आपल्यापुढे शीख उभे राहतात, पण पंजाबात शिखांचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे तर हिंदू व इतर मिळून ४० टक्के असतील. शीख हे मुख्यतः शेतकरी आहेत, तर हिंदू समाज व्यापारउदीम करणारा व नोकरीपेशातला आहे. एकूण शेतकऱ्यांमध्ये ७० टक्के शीख आहेत व ते ग्रामीण भागात राहतात. ते सामान्यतः राकट, अल्पशिक्षित समजले जातात. आपल्याला वाटते त्याप्रमाणे सगळेच शीख श्रीमंत नसतात. हिंदू बव्हंशी शहरांमधून राहतात. कायम नुकसानीत राहिलेल्या शेतीमुळे 'भारत'वासी शीख शेतकरी गरीब राहिले, तर 'इंडिया'वासी हिंदू नागर समाज तुलनेने समृद्ध झाला. मुळात चंडीगढ हे एक खूप आधुनिक शहर. रस्ते, फुटपाथ, चौक, उद्याने, दुकाने, घरे सगळेच अगदी चकाचक. पुण्या-मुंबईसारख्या शहरांतून

२७६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा