पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाडण्यासाठी आवश्यक ते आर्थिक व कार्यकर्त्यांचे बळ युनियनकडे होते. शरद जोशींसारखा एकही मोठा नेता त्यांच्याकडे नव्हता, पण सामूहिक नेतृत्वाचा एक आदर्श यांनी प्रस्थापित केला होता. ह्या संदर्भात परभणी अधिवेशनातला एक प्रसंग बोलका होता.
 'शरद जोशी झिंदाबाद' ह्या अधूनमधून दिल्या जाणाऱ्या घोषणेला पंजाबहून आलेले बलबीरसिंग राजेवाल ह्यांनी विरोध केला होता. स्वतः शरद जोशी यांनी 'माझ्या नावाच्या घोषणा देऊ नयेत' असे व्यासपीठावरून सांगितले. पण तरीही कार्यकर्त्यांना ते पटले नाही व त्या घोषणा चालूच राहिल्या. 'हा कदाचित तुमच्या आमच्या धर्मातला फरक आहे. तुमच्याकडे कुठल्याच एका देवाची पूजा अशी होत नाही. तुमच्याकडे मूर्तीपूजाही नाही. गुरूही दहा आहेत व त्यानंतर तुम्ही कोणाला गुरू म्हणून स्वीकारलेच नाही. आमच्याकडे मात्र असंख्य देव आहेत व असंख्य संतपुरुषही आहेत, ज्यांना देवासारखा मान दिला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जयजयकार हा आम्हाला खटकत नाही, उलट आवश्यक वाटतो. कारण मूर्ती जसे देवाचे प्रतीक बनते तशीच ती व्यक्ती एक विचारांचे प्रतीक बनते व इतरांना एकत्र यायला कारणीभूत ठरते.' - असे स्पष्टीकरण त्यावेळी महाराष्ट्रातील काही शेतकरीनेत्यांनी राजेवाल ह्यांना दिले होते. राजेवाल ह्यांना काही ते पटले नव्हते, पण मग त्याकडे त्यांनी शेतकरी एकजुटीचे व्यापक महत्त्व विचारात घेऊन दुर्लक्ष केले.

 हिंदू-शीख तेढ हा एक महत्त्वाचा मुद्दा पंजाबच्या संदर्भात नेहमी पुढे येतो; निदान त्या काळात तरी यायचा. साताऱ्याचे डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेल्या एका लेखात ह्या संदर्भात काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. देशान्तरवास या आपल्या एका लेखात ते लिहितात,

सरदारांचा प्रश्न उग्र होणार हे १९८२ साली एशियाड झाले त्याच वेळी नक्की झाले होते. एशियाडच्या वेळी मी खूप भटकलो होतो. प्रचंड किंमत मोजून जगमोहन यांनी एशियाड फत्ते करून दाखवले. त्यावेळी अतिरेकी नव्हते असे नाही, सरदार आपल्यावर अन्याय होतो म्हणून चिडलेले नव्हते असेही नव्हे; पण काट्याचा नायटा झालेला नव्हता. जगमोहन यांनी ते सहजपणे करून दाखवले. सरदार मुळातच खेळप्रेमी आणि उत्सवप्रेमी. ट्रॅक्स आणि बसेस भरभरून खेळ पाहण्यासाठी खेड्यापाड्यांतून सरदार येत होते आणि हरियाणाच्या सीमेवरून, ते फक्त सरदार आहेत म्हणून, त्यांना परत पाठवले जात होते. प्रत्येक स्टेडीयमवर कडक तपासणी होत होती. चुकूनसुद्धा एकही सरदार ह्या तपासणीतून सुटत नव्हता. तो केवळ सरदार आहे म्हणून पागोट्यापासून सारे काही सोडून तपासले जात होते!प्रत्येक सरदार फक्त सरदार आहे म्हणून स्वतःच्या देशात गुन्हेगार ठरत होता! पूर्वी गावात रामोशी ठरत असत, तसा! सरदारांना ह्यावेळी काय यातना झाल्या असतील, हे दलितांनासुद्धा समजणार नाही. दलित आपल्या तोंडावर आपण दलित आहोत,

अटकेपार२७५