पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टाकला. त्याप्रसंगी खरोखरच ह्या दोन कुटुंबांनी आमचे प्राण वाचवले. नाहीतर काय झालं असतं ह्या विचारानेही अंगावर काटा उभा राहतो. पुढे सगळं शांत झाल्यावर मी व माझे यजमान मुद्दाम कोपरगावला जाऊन बद्रीनाथ व भाऊ बोरावके यांच्या घरच्यांना भेटलो व त्यांचे आभार मानले. त्यांच्याविषयीची कृतज्ञता आजही आमच्या मनात कायम आहे. शेवटी त्यांनीच तर माझ्या पतीला दुसरी जिंदगी दिली."
 पंजाबातील शेतकऱ्यांच्या हृदयात जोशींना एक खास जिव्हाळ्याचे असे स्थान प्राप्त झाले ह्याचे एक कारण त्यांचे हृदयाला हात घालणारे वक्तृत्व हेही आहे. उदाहरणार्थ, भारत-पाक सीमेलगत असलेल्या भगतसिंग, सुखदेव व राजगुरू ह्यांच्या स्मारकापाशी झालेली एक सभा. नेहमी गुन्हेगारांना सूर्योदयाच्या वेळी फाशी द्यायची पद्धत. पण आदले काही दिवस लाहोरमध्ये धुमसत असलेला असंतोष विचारात घेऊन इंग्रज शासनाने फाशीसाठी सूर्यास्ताची वेळ निवडली होती. त्यावेळी घडलेल्या एका प्रसंगाच्या ऐकीव माहितीचा उपयोग करत जोशी सभेत म्हणाले होते,
 "हे तिघेही क्रांतिकारक फाशीच्या क्षणाची वाट पाहत, टाचा उंचावलेल्या व हात मागे बांधलेल्या अवस्थेत उभे होते. भगतसिंग त्या तिघांत उंच. त्यांना राजगुरूंनी विचारलं, 'समोर तुला काय दिसतं आहे?' भगतसिंग उत्तरले, 'मला ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य अस्ताला जाताना दिसतो आहे!' ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही अशी ख्याती होती, त्या साम्राज्यावरचा सूर्य अस्ताला जाताना त्या द्रष्ट्या क्रांतिकारकाला दिसत होता. मलासुद्धा आज इथे 'भारता'वरील 'इंडिया'चा सूर्य अस्ताला जाताना दिसत आहे!"
 ह्यावर समोरच्या विराट सभेतील हजारो श्रोत्यांची मने उचंबळून आली नसती तरच नवल. खरेतर जोशींचे हिंदी फारसे चांगले नव्हते; पण तरीही पंजाबात त्यांची हिंदी भाषणे अधिकाधिक उत्तम होत गेली. विचार सुस्पष्ट असले व बोलणे अंतःकरणपूर्वक असले, तर भाषा आड येत नाही ह्याचे ते ज्वलंत उदाहरण होते.

 जोशींप्रमाणे इतर सर्वच कार्यकर्ते पंजाबात रमले. इथले आदरातिथ्य खूपदा महाराष्ट्रातील पाहुण्यांना काहीसे लाजवणारे असे. 'आप हमारे मेहमान है,' म्हणत इथले यजमान महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना कधीही खिशात हात घालू देत नसत. इथला नाश्ता म्हणजे अगदी जेवणाच्या वरताण! भरपूर मख्खन चोपडलेले परोठे, दाट लस्सी वगैरे! त्यात पुन्हा आग्रह करकरून खाऊ घालणे. साधी सकाळची अंघोळ, पण तीही इथल्या अंगणामध्ये संस्मरणीय असे. अंघोळीपूर्वी शरीराला रगडून मोहरीच्या तेलाचे मालिश करून देणारा कोणीतरी असायचा. बटन दाबले, की तीन इंच व्यासाच्या लोखंडी पाइपातून पाण्याचा भलामोठा लोट अंगावर कोसळू लागे! 'पाच हॉर्सपॉवरची अंघोळ' हा शब्दप्रयोग महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय झाला होता. पंजाबातील भारतीय किसान युनियन एक बळकट संघटना होती. तिचे नोंदणीकृत असे लाखाच्यावर सदस्य होते व साहजिकच सर्व कार्यक्रम उत्तमप्रकारे पार

२७४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा