पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीनच्या सुमारास ते फिल्लूरमधील आपला पूर्वनियोजित कार्यक्रम आटोपून खास विमानाने चंडीगढमध्ये दाखल झाले व मोटारने थेट राजभवनमध्ये जाऊन पोचले. एकूण परिस्थिती त्यांच्या लक्षात आली होती. काही उच्च अधिकाऱ्यांची तातडीची बैठकही त्यांनी लगेचच बोलावली. नंतर मान व जोशींसह प्रमुख शेतकरीनेत्यांनाही त्या बैठकीत बोलावले व वाटाघाटींनी प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न स्वतःच्या पुढाकारातून केला. पण आंदोलन मागे घ्यायला शेतकरीनेत्यांनी नकार दिला. संध्याकाळपासून राजभवनाला वेढा पडणार हे आता नक्की झाले. 'वेढ्याच्या कालावधीत आपण राजभवन सोडून कुठेही बाहेर जाणार नाही' असे आश्वासन राज्यपालांनी त्यावेळी शेतकरीनेत्यांना दिले.
 सगळे नेते घाईघाईने पुन्हा परेड ग्राउंडवर आले. शेतकऱ्यांच्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला होता. लोकांचा उत्साह आता अगदी शिगेला पोचला होता. इतक्या लोकांना दीर्घकाळ शांत ठेवणे अवघड होते; काही ना काही घडत राहणे आवश्यक होते. काही मिनिटांतच सभेला सुरुवात झाली. सभेत पंजाबमधील नेते अजमेरसिंग लोखोवाल, बलबिरसिंग राजेवाल, भूपेंद्रसिंग मान, हरयाणाचे नेते मांगीराम मलिक, मध्यप्रदेशचे विनयचंद्र मुनीमजी, उत्तरप्रदेशचे डॉ. रघुवंशमणि पांडे व समन्वय समितीचे संयोजक विजय जावंधिया यांची भाषणे आधी झाली. सर्वात शेवटी जोशी बोलले. "आम्ही आपल्या मदतीसाठी आलेलो नाही. लहान भाऊ मोठ्या भावाला काय मदत करणार? पण आपल्या सुखदःखाच्या गोष्टी करायला आम्ही इथे आलो आहोत. ज्यांच्या हाती सेनेकडे असलेल्या हत्यारांपेक्षाही प्रभावी असं गव्हासारखं हत्यार आहे, त्यांना कोणाच्याही मदतीची गरज नाही." त्यांचा शब्दन्शब्द सगळे श्रोते विलक्षण शांततेत ऐकत होते. प्रत्येकाच्या काळजाला भिडणारे ते भाषण होते.

 परेड मैदानावरची सभा संपल्यावर साधारण सहाच्या सुमारास सर्व शेतकरी सहा वेगवेगळ्या गटांत विभागले गेले व शिस्तबद्ध रांगा करून अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या राजभवनकडे घोषणा देत चालू लागले. पूर्वी ठरल्याप्रमाणे राजभवनकडे जाणाऱ्या सहाही रस्त्यांवर जाऊन नियोजित जागी त्यांनी धरणे धरले. पहिला गट सेक्टर सात आणि आठ यांच्यामधून राजभवनवर गेला. सगळ्यात मोठा गट गोल्फ क्लबच्या समोरून राजभवनवर गेला. ह्या गटात जोशी व मान होते. शेवटचा गट लेक क्लबच्या समोरून राजभवनवर गेला, चारी बाजूंनी आता राजभवनाला शेतकऱ्यांचा वेढा पडला होता. तोवर संध्याकाळचे सात वाजले होते. तसे हे सहाही रस्ते सकाळी नऊपासुनच पंजाब पोलिसांनी लोखंडी खांब जाळ्या लावून बंद केले होते. त्या अडथळ्यांच्या अलीकडे शेतकऱ्यांनी रस्त्यांवरच मांडी ठोकली होती आणि अडथळ्यांच्या पलीकडे, राजभवनाच्या भिंतीपर्यंत हजारोंच्या संख्येने पोलीस हजर होते. चंडीगढ़ प्रशासनाने पंजाब व हरयाणा सरकारव्यतिरिक्त केंद्राकडूनही सुरक्षारक्षकांची कुमक मागवली होती. सुमारे १५,००० पोलीस, एसआरपी व बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान राजभवन परिसरात सुसज्ज उभे होते. चंडीगढ ही पंजाब व हरयाणा ह्या दोन्ही राज्यांची राजधानी. ती केंद्रशासित आहे. दोन्ही राज्यांची स्वतंत्र राजभवने आहेत. हा वेढा पंजाबच्या राजभवनला होता.

अटकेपार२६३