पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आम्ही निर्वासित म्हणून इथे आलो. अगदी नेसत्या कपड्यानिशी. तेव्हाच्या जखमा भरून निघायला बरीच वर्षं लागली."
 पंजाबातील शेतकरी चळवळीच्या पार्श्वभूमीबद्दल पुढे मान म्हणाले,
 "छोटूराम ह्यांची जमीनदारा युनियन हेच आमच्या आजच्या बीकेयुचे मूळ रूप आहे. पंजाबात शेतकरी छोटा असला तरी त्याला 'जमीनदार' (म्हणजे जमीन असणारा) म्हणत. पुढे काळाच्या ओघात जमीनदार' ह्या शब्दाला एक वेगळा, तिरस्करणीय असा अर्थ प्राप्त झाला व संघटनेच्या नावातील 'जमीनदार' शब्द गळून १९७२ साली 'खेतीबाडी युनियन' अस्तित्वात आली."
 आणीबाणीच्या काळात कित्येक महिने मान व त्यांचे अनेक शेतकरी कार्यकर्ते तुरुंगात होते. पण तेव्हा आणि नंतरची अनेक वर्षे ते तसे कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नव्हते. अकाली दल हा खरे तर पंजाबातील शेतकऱ्यांचा व म्हणून बहुसंख्य शिखांचा पारंपरिक पक्ष, पण मान ह्यांच्या मते तो खूप भ्रष्ट आहे व म्हणून २००२पासून त्यांनी अधिकृतरीत्या काँग्रेसला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री व पतियाळाचे माजी महाराज कॅप्टन अमरिंदर सिंग ह्यांनाही अनेक शेतकरी आंदोलनांत त्यांनी सामील करून घेतले. त्यांचे चिरंजीव गुरपरतापसिंग मान उच्चशिक्षित इंजिनिअर व एमबीए आहेत. Punjab Infrastructure Development Limited ह्या महत्त्वाच्या शासकीय आस्थापनेचे ते प्रमुख होते. पण विशिष्ट कंत्राटदारांनाच कामे दिली जावीत ह्यासाठी सत्तेवर असलेल्या अकाली नेत्यांकडून जो दबाव येत होता, त्याला वैतागून त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. सध्या ते पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आहेत. ते सहकुटुंब चंडीगढमध्ये राहतात. त्यांच्या पत्नी दंतवैद्य (dentist) असून पुण्यातील दंत महाविद्यालयात शिकलेल्या आहेत.
 "सगळ्या देशाला तुम्ही धान्य पुरवता; मग तुमच्या शेतकऱ्यांसमोर अडचण कसली असू शकते?" असा प्रश्न मी मान यांचे चिरंजीव गुरपरतापसिंग यांना आमच्या चंडीगढमधील पहिल्याच जेवणाच्या वेळी विचारला.
 "तीच तर खरी अडचण आहे! सगळ्या देशाला आम्ही धान्य पुरवतो हेच आमच्या समस्येचं मूळ आहे!" काहीशा कोड्यात बोलल्याप्रमाणे ते म्हणाले. मग पुढल्या अर्ध्या-एक तासात त्यांनी त्यांचा मुद्दा स्पष्ट केला. "शेती ही तोट्यातच असल्यामुळे जेवढी शेती अधिक, तेवढा तोटा अधिक, असं हे साधं गणित आहे. जास्त उत्पादन म्हणजेच जास्त तोटा. आमचं उत्पादन अधिक, म्हणून आमचा कर्जबाजारीपणाही अधिक," ते म्हणाले.

 हरितक्रांती झाली त्यावेळी मुख्यतः सुधारित बियाणे व खतांचा भरपूर वापर ह्यांमुळे भरघोस पिके निघू लागली. सुरुवातीला सगळे खूश होते. पण नंतर इतके पीक काढूनही आपले कर्जबाजारीपण कमी होत नाही, ही गोष्ट पंजाबातील सर्वच शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागली. बियाणे, खते, डिझेल, वीज, शेतमजुरी वगैरे सर्व खर्च सतत वाढत गेले व त्याप्रमाणात शेतीमालाच्या किमती मात्र फारशा वाढल्या नाहीत. वर्षानुवर्षे त्या किमती केंद्र सरकारच ठरवत आले आहे. परिणामतः खर्च आणि आमदनी ह्याचा मेळ बसेना. खतांच्या अतिरिक्त

२५४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा