पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वापरामुळे झालेली जमिनीची हानी, कूपनलिका अधिकाधिक खोल जात राहिल्याने खालचे क्षार वर यायचे प्रचंड प्रमाण, पाण्याचा अनिर्बंध वापर व ह्या सगळ्यातून होणारी एकूणच पर्यावरणाची हानी हाही प्रकार लोकांच्या लक्षात येत गेला. शेतकऱ्यांमधला असंतोष वाढतच गेला. ह्या असंतोषातूनच पुढे खलिस्तानवाद्यांना उत्तेजन मिळत गेले. शीख शेतकरी तो ग्रामीण, हिंदू व्यापारी तो शहरी; शीख तो शोषित, हिंदू तो शोषक अशा प्रकारे एकूण आर्थिक वास्तवाचे विकृत असे सुलभीकरण केले गेले. मतांच्या राजकारणासाठी काही नेत्यांनी आगीत तेल ओतायचे काम केले. शेती किफायतशीर राहिली नाही, ह्या मूळ आर्थिक प्रश्नाला हिंदू-शीख धार्मिक तेढीचे स्वरूप प्राप्त झाले.
 १९९० ते १९९६ भूपिंदरसिंग मान राज्यसभेचे सदस्य होते. तिथे मान यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी एक महत्त्वाची कबुली दिली होती. पंतप्रधान म्हणाले होते, "भारतातील शेतकऱ्याला शेतीमालाचा भाव देताना ७२% उणे सबसिडी दिली जाते." म्हणजेच त्याला सरकारतर्फे अनुदान स्वरूपात खरेतर काहीच दिले जात नाही, उलट त्याचे उत्पन्न १०० रुपये असले, तर सरकारने त्याच्याकडून शेतीमालाच्या वाजवी भावापेक्षा कमी भाव देऊन ७२ रुपये मिळवलेले असतात.
 सरकार शेतकऱ्यांच्या विकासाला कशी बाधा घालते ह्याचे एक उदाहरण मान यांनी दिले. भात भरडून तांदूळ करण्याचे एक छोटेसे मशीन (हलर) परदेशात जेमतेम तीन-चार हजार रुपयांत उपलब्ध होते. ते भारतात आणायचे व तशीच यंत्रे इथे बनवून ती विकायची योजना एका कल्पक शीख तरुणाने मांडली. मान म्हणाले, "पण लायसन्स-परमिटराजच्या त्या जमान्यात सरकारने त्याला परवानगी नाकारली. खूप इच्छा असूनही शेवटी ती योजना त्याला गुंडाळून ठेवावी लागली. पावलोपावली होणारा सरकारी हस्तक्षेप शेतकरीहिताची कायमच अशी गळचेपी करतो. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिलं असतं तर इतर देशांत घडलं ते इथेही घडलं असतं; शेतकऱ्यांनी स्वतःच कितीतरी उपयुक्त यंत्रं शोधून काढली असती. कारण पंजाबी शेतकरी तसा खूप हिकमती आहे, टेक-सॅव्ही म्हणतात तसा आहे."

 सुदैवाने आज मान यांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे, दोन्ही मुले सुस्थित आहेत. एक अमेरिकेत, दुसरा चंडीगढला. तरीही सकाळपासून रात्रीपर्यंत मान सतत कामात असतात. शेतीचे बरेचसे काम त्यांच्या पत्नी – ज्यांना सगळे भाभीजी म्हणतात – सांभाळतात. त्यामुळे आपल्या सामाजिक कामासाठी मान यांना पुरेसा वेळ मिळतो. देशभरच्या शेतकरी नेत्यांच्या ते संपर्कात असतात; खूप प्रवास करतात. महाराष्ट्रातही ते पंधरा-वीस वेळा सहज आले असतील. शेतकऱ्यांच्या अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे ते तीन वेळा अध्यक्ष होते. त्यांचा व्यासंगही दांडगा आहे. शेतकरी आंदोलनाबाबतची सर्व कात्रणे त्यांनी आपल्या बटाला येथील घरातील कार्यालयात, चार गोदरेजच्या कपाटांत व्यवस्थित विभागणी करून, फायलींमध्ये लावून ठेवली आहेत.

अटकेपार२५५