पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केंद्र आहे. समाजाचे केंद्र आहे. निर्मितीचे केंद्र आहे. व्यक्तीची काळजी घेतली तर समाजाची काळजी घ्यायची काहीही आवश्यकता नाही.

(समाजसेवेची दुकानदारी नको!, अंतर्नाद, फेब्रुवारी २००७)

 'भीक नको, हवे घामाचे दाम' हा संदेश जोशी आपल्या कार्यकर्त्यांना देतात. त्यांना विचार कसा करायचा ते शिकवतात. हिंसक बनू नका म्हणतानाच निर्भय बनायला सांगतात. स्वातंत्र्य हेच आपले अंतिम उद्दिष्ट आहे व दारिद्र्य दूर करायचे आहे, ते ह्या दारिद्र्यामुळे स्वातंत्र्याचा अतिशय संकोच होतो म्हणून, ह्याविषयी त्यांच्या मनात जराही संदेह नाही. स्वाभिमान, स्वातंत्र्य, बुद्धिनिष्ठा हे त्यांचे परवलीचे शब्द आहेत. हे त्यांचे विचार शेतकऱ्यांना सहजगत्या समजले, त्याच्या अंतःकरणाला भिडले. दबलेला, पिचलेला शेतकरी ताठ मानेने उभा राहिला तो त्यामुळेच.
 निपाणीला एका तंबाखू शेतकऱ्यांच्या सभेत ते म्हणाले होते,
 "तुमची भाकरीची अडचण आम्ही कुठूनही ज्वारी आणून भागवू शकतो; पण एक गोष्ट आम्ही देऊ शकत नाही. ती म्हणजे हिंमत. ती तुमची तुम्हालाच कमवायला पाहिजे. हिंमत असल्याखेरीज तुम्हाला किंमत मिळणार नाही. तंबाखूचं पीक काढताना त्याबरोबर एकेक हिमतीचं झाड लावता येत नाही. ती आपली आपणच तयार करायला हवी."
 आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असे हिमतीचे झाड लावणारी शिबिरे वर्धा आणि अंबाजोगाईनंतरही अनेक ठिकाणी शेतकरी संघटनेने घेतली. आंबेठाण येथे ज्या जागी पूर्वी लीलाताईंची पोल्ट्री होती. त्याच जागी पुढे ही प्रशिक्षण शिबिरे भरू लागली. खरे म्हणजे, आंदोलने करताकरताच कार्यकर्ते शिकतही होते; शेतकरी संघटना हे जणू एक विद्यापीठच होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी अगदी सुरुवातीला केलेली वैचारिक मांडणी इतकी मूलगामी होती, की पुढली अनेक वर्षे तिच्यात फारसा काही बदल करायची आवश्यकताच जाणवली नाही. आपले विचार कालातीत नाहीत, असे जोशी म्हणाले असले, तरीही ते विचार काळाच्या कसोटीवर प्रदीर्घ काळासाठी महत्त्वाचे ठरले. त्यातून पक्की झालेली कार्यकर्त्यांची मूलभूत वैचारिक बैठक हे संघटनेचे मोठे सामर्थ्य बनले.
 काळाच्या ओघात अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या व्यक्तिगत कारणांसाठी जोशींची साथ सोडून अन्यत्र कुठे-कुठे गेले, पण तरीही ती मूळची वैचारिक बैठक सोडायची आवश्यकता त्यांना कधी भासली नाही. त्या काळातील किंवा नंतरच्या इतर अनेक आंदोलनांत सामील झालेल्या कार्यकर्त्यांना अशी दीर्घ काळासाठीची वैचारिक बैठक लाभली नाही.
 आंदोलनात उतरणारे लक्षावधी शेतकरी हे शेतकरी संघटनेचे दृश्य वैभव होते; भक्कम विचार हा तिचा पाया होता.


२५०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा