पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीन आठवड्यांनी, म्हणजे १४ मार्चपासून, पुणेबंगलोर हा महामार्ग रोखून धरायचा निर्धारही या सभेत जाहीर केला गेला.
 सभेत एकमताने मंजूर झालेल्या ह्या मागणीपत्राची प्रत त्याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी, अन्नमंत्री राव बिरेंद्र सिंग, व्यापारमंत्री प्रणवकुमार मुखर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री गुंडू राव व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले यांना रजिस्टर्ड पोस्टाने रवाना केली गेली. खरे तर ह्यांतील कुठलीच मागणी अवास्तव अशी नव्हती, पण तरीही सरकारी यंत्रणा इतकी मुर्दाड बनली होती, की १४ मार्चपर्यंत ह्यांपैकी एकाकडूनही त्या पत्राची साधी पोचसुद्धा आली नाही; काही कृती करणे तर दूरच राहिले.
 सरकारकडून ठोस असे काहीच घडत नाहीए हे बघितल्यावर शेवटी ठरल्याप्रमाणे १४ मार्च १९८१ रोजी दुपारी तीन वाजता रास्ता रोकोला सुरुवात झाली. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग चारवर निपाणीला वळसा घालून जाणारा बायपास आणि निपाणी गावात जाणारा रस्ता ह्यांच्या नाक्यावर शेतकरी ठिय्या देऊन बसले. हे स्थळ निपाणीपासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर होते.
 'शेतकरी संघटनेचा विजय असो', 'शरद जोशी झिंदाबाद' अशा घोषणा तारस्वरात दिल्या जात होत्या. हळूहळू चिकोडी तालुक्यातील ५१ छोट्यामोठ्या खेड्यांतील शेतकरी वेगवेगळ्या मिरवणुकांनी रास्ता रोको चालू होते तिथे येऊ लागले. त्यांच्यासोबत सातशे बैलगाड्यादेखील होत्या. हुक्केरी व गोकाक तालुक्यांतील गावांमधील शेतकरी, तसेच निपाणीतील तंबाखू कामगार व विडी कामगार हेदेखील रास्ता रोकोत सामील झाले. त्यांची एकूण संख्या पहिल्याच दिवशी पंधरा हजारावर गेली. महामार्गावर या साऱ्यांनी आपापल्या राहुट्या उभारल्या. तिथे कदाचित अनेक दिवस राहावे लागेल ह्या बेताने आपापले सामानसुमान घेऊनच हे सगळे आले होते. त्याशिवाय, दिवसभर आंदोलनात सहभागी होणारे, पण रात्री झोपायला तेवढे आपापल्या घरी जाणारे, असेही अनेक लोक तिथे येऊन दाखल होऊ लागले.
 ही सर्व मंडळी आपापली शेतीची कामे सोडून इथे आली होती. त्यात जे शेतमजूर होते ते आपली रोजची पाच रुपयांची मजुरी बुडवून आंदोलनात सामील झाले होते. पैसे देऊन एखाद्या आंदोलनासाठी माणसे गोळा करायची प्रथा त्यावेळीही होतीच; स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन लोक आंदोलनात येत आहेत हे दृश्य खूप दुर्मिळच होते.
 त्याच दिवशी रात्री कृतिसमितीचे अध्यक्ष अण्णू गुरुजी ह्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बंगलोरला मुख्यमंत्री गुंडू राव यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी रवाना झाले. दुसऱ्या दिवशी गुंडू राव त्यांना भेटले. "तुम्ही अतिशय शांतपणे हे आंदोलन सुरू केले आहे ही फार चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. मी ह्याबद्दल केंद्र सरकारशी बोलतो, कारण ह्याबाबतचे निर्णय शेवटी केंद्र सरकारच घेऊ शकते," असे मुख्यमंत्री शिष्टमंडळाला म्हणाले. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी तसे काहीच केले नाही.

धुमसता तंबाखू - १७५