पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
धुमसता तंबाखू


 तंबाखू हे कुठल्याही अर्थाने जीवनावश्यक पीक नाही; चैन म्हणून केवळ त्याचा वापर होतो. एकदा तंबाखूची चटक लागली. की ती सुटणे अवघड: निकोटिनचे सगळे दुष्परिणाम ठाऊक असूनही. दरवर्षी सरकार सिगरेटवर अधिकाधिक कर लादत असते आणि तरीही सिगरेटचा खप काही कमी होत नाही. सिगरेट हे मजेचे, ऐष करण्याचे, तसेच मर्दानगीचे एक प्रतीक म्हणून जगभरच्या जाहिराततज्ज्ञांनी समाजमनात वर्षानुवर्षे स्थिर केले आहे. 'Live Life King Size' यासारख्या जाहिराती वर्षानुवर्षे बड्या नटांना घेऊन जगभरच्या नामांकित नियतकालिकांतून झळकत असत; आता सरकारने बंदी घातल्यामुळे त्या थांबल्या आहेत एवढेच; पण बंदी आहे म्हणून, किंवा सिगरेट ओढल्याने कॅन्सर होतो हे सिद्ध झाले आहे म्हणून सिगरेटसेवनाचे प्रमाण कमी झाले आहे असे नव्हे. अशा सिगरेट्स बनवणाऱ्या कंपन्या चित्रप्रदर्शनापासून नाट्यमहोत्सवापर्यंत अनेक सांस्कृतिक उपक्रमांच्या बड्या प्रायोजक असतात हा एक मोठाच विरोधाभास म्हणायचा.
 तंबाखूसेवनाचा सिगरेट हा एकमेव प्रकार नव्हे. भारतात सिगरेटपेक्षा विडी पिणाऱ्यांचे प्रमाण अधिकच असेल आणि गुटखा-जर्दा खाणाऱ्यांचे प्रमाणही तेवढेच किंवा कदाचित त्याहून जास्तही असू शकेल. तपकीर ह्या स्वरूपात किंवा नुसताच तंबाखू खाणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. सुमारे तीन-चारशे वर्षांपूर्वी युरोपियन व्यापाऱ्यांनी लॅटिन अमेरिकेतून हे पीक भारतात आणले असे म्हणतात. आज तंबाखूच्या उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. सुमारे चाळीस लाख शेतकरी कुटुंबांचे पोट आजही ह्या पिकावर अवलंबून आहे; त्यांमध्ये विड्या वळण्याचे काम करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे.

 पूर्वीच्या काळी तर विडी उद्योगाचे महत्त्व खूपच होते. जिथे शेती पूर्णतः पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे त्या भागात पाऊस कमी झाला, तर शेतकऱ्यांची अगदी अन्नान्नदशा होते. अशा वेळी विडी उद्योग हाच त्यांचा आधार असायचा; ग्रामीण भागात इतर उद्योगधंदे जवळजवळ नव्हतेच. विड्या वळण्याचे काम कोणालाही, कुठेही करता येते, अगदी घरीही. त्यासाठी शिक्षणाची काही पूर्वअट नाही. महिलाही हे काम करू शकतात; किंबहुना, विडीकामगार बव्हंशी महिलाच असतात. ह्या उद्योगाची रोजगारक्षमता खूप असल्याने त्याची वाढही देशात अनेक ठिकाणी झाली. 'गरिबाचे व्यसन' म्हणून विड्यांचा प्रसारही खूप झाला. अनेक समाजांत महिलाही विडी ओढत असत; हे प्रमाण पूर्वी तर अधिकच होते. ग्रामीण

१६६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा