पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भागात जेव्हा साम्यवाद्यांनी कामगार संघटना उभारायला सुरुवात केली, तेव्हा बहुतेकदा ही सुरुवात विडीकामगारांपासूनच होत असे.
 मुख्यतः गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्रात तंबाखूचे पीक निघते. कर्नाटकातील तंबाखू सर्वोत्तम मानला जातो. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी, हुक्केरी आणि गोकाक हे तीन तालुके म्हणजे या दर्जेदार तंबाखूचे आगर. कर्नाटकात होणाऱ्या एकूण तंबाखूपैकी सुमारे ८० टक्के ह्याच तीन तालुक्यांत होतो. निपाणी शहर चिकोडी तालुक्यात आहे. हे इथले व्यापाराचे मुख्य केंद्र. देशभरातले व्यापारी निपाणीला हजेरी लावतात.


 निपाणी परिसरातील जमीन खूप सुपीक आहे. कोणतेही पीक इथे उत्तम येऊ शकते. पण ऊस व तंबाखू हीच दोन पिके इथे प्रमुख आहेत. त्यातही उसापेक्षा तंबाखूच अधिक. ऑगस्ट ते फेब्रुवारी ह्या कालावधीत साधारण पाच महिन्यांत हे पीक येते.
 निपाणीत पूर्वी ज्वारी, हरभरा, उडीद, भुईमूग ही पिके घेतली जात. पुढे सरकारनेच स्वतःला कराच्या स्वरूपात अधिक प्राप्ती व्हावी म्हणून तंबाखूसारख्या व्यापारी पिकाची लागवड करायला उत्तेजन दिले. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रातदेखील उसाच्या बाबतीत हाच प्रकार घडला होता. आज जरी अपुऱ्या पाण्यामुळे 'साखर की भाकर' असा प्रश्न अनेक विचारवंत उपस्थित करत असले, तरी एकेकाळी नाशिक-नगर भागात भंडारदरा धरणाचे पाणी वापरले जावे व पाणीपट्टीतून धरणाचा खर्च थोडाफार तरी भरून निघावा, ह्या उद्देशाने तत्कालीन ब्रिटिश सरकारनेच अधिक पाणी लागणाऱ्या उसाची लागवड करायला तेथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले होते! निपाणी येथेही असाच प्रकार झालेला दिसतो. सरकारी प्रोत्साहनाने सुमारे १८९०च्या आसपास इथे तंबाखूची लागवड सुरू झाली.
 निपाणीपुरता विचार केला. तर देवचंद शहा यांचे पूर्वज इथले तंबाखूचे पहिले व्यापारी. सर्वांत मोठे आणि प्रतिष्ठित. मूळचे अकोळ गावचे. १९८०च्या सुमारास 'टोबॅको किंग' म्हणूनच देवचंद शेट ओळखले जात. अनेक घरांमधून त्यांच्या फोटोची पूजाही होत असे; आपले अन्नदाता म्हणूनच सामान्य शेतकरी ह्या कुटुंबाकडे पाहत असे.
 व्यापारी देतील तेवढे पैसे गुपचूप घ्यायचे आणि त्यातच भागवायचे हे शेतकऱ्याच्या अगदी अंगवळणी पडले होते. व्यापारी सांगतील त्या कागदावर, कधी कधी तर कोऱ्या कागदावरही, आपला अंगठा उमटवायचा हे इथे सर्रास व्हायचे. व्यापाऱ्यांची दहशत प्रचंड असे. इतकी, की व्यापाऱ्यांच्या पेढ्यांसमोरून वा बंगल्यांसमोरून जाताना शेतकरी आपल्या चपला उचलून डोक्यावर घेत व मग पुढे चालू लागत.
 शेतकरी जेव्हा तंबाखू विकायला बाजारपेठेत घेऊन यायचा, तेव्हा तंबाखूच्या एकूण वजनातून अनेक प्रकारची घट (जिला इथे 'सूट' म्हटले जाई) वजा करून उरलेल्या वजनाचेच पैसे शेतकऱ्याला दिले जात.

 तंबाखूत पानांचे देठ, बारीक काड्या, शेतातील माती आलेली आहे असे कारण सांगून काडीमाती सूट घेतली जाई. ही पहिली सूट. हवेचा तंबाखूच्या वजनावर परिणाम होतो, असे

धुमसता तंबाखू १६७