पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 इथे प्रतिभावान पत्रकार व लेखक विजय परुळकर यांच्याविषयी लिहायला हवे. पाच वर्षे जर्मन टेलिव्हिजनबरोबर आणि दहा वर्षे संयुक्त राष्ट्रसंघाच्या युएनडीपी या संस्थेचे एशिया खंडासाठीचे प्रसारप्रमुख म्हणून व्हिएतनाम, कंबोडिया वगैरे ठिकाणी नोकरी केल्यानंतर, स्वेच्छेने ती सोडून परुळकर व त्यांच्या पत्नी सरोजा सप्टेंबर १९७७मध्ये भारतात परतले व पुण्यात प्रभात रोडवर स्थायिक झाले. अनेक स्वयंसेवी संस्थांच्या प्रचारार्थ यांनी आपले लेखणीचे व छायाचित्रणाचे कौशल्य वापरले. 'माणूस' साप्ताहिकाचे श्री. ग. ऊर्फ श्रीभाऊ माजगावकर यांच्या संपर्कात ते आले व 'माणूस'मधून लिहीत गेले. वेगवेगळ्या विकासयोजनांचा अभ्यास करत महाराष्ट्रभर भटकत असताना त्यांची सप्टेंबर १९८०मध्ये शरद जोशींशी गाठ पडली. जोशींचे कार्य आणि विचार यांनी ते अगदी भारावून गेले. हातातील सर्व व्यावसायिक कामे बाजूला सारून विजय व सरोजा परुळकर सप्टेंबर १९८० ते मे १९८१ असे सलग नऊ महिने जोशी यांच्याबरोबर फिरले. स्वतःच्या खर्चाने, त्या काळात त्यांनी जे पाहिले, ऐकले, अनुभवले त्यावर आधारित 'योद्धा शेतकरी' ही लेखमाला त्यांनी 'माणूस'मध्ये लिहिली. तिचा पहिला प्रदीर्घ भाग 'माणूस'च्या १९८० सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. ही लेखमाला त्यांनी खूप ओघवत्या शैलीत लिहिली होती आणि तिला मोठा वाचकवर्ग लाभला. पुढे ती 'राजहंस प्रकाशन'तर्फे १० जून १९८१ रोजी पुस्तकरूपातही प्रसिद्ध झाली.
 जोशी अनेक भाषणांत 'शेतकरी संघटनेचा विचार पसरवण्याचे निम्मे काम योद्धा शेतकरीने केले आहे' असे सांगत असत. पुस्तकाची दुसरी आवृत्ती पुण्यातील न्यू सुप्रीम कॅलेंडर्सच्या नाना आठवले यांनी मुख्यतः शेतकरी संघटनेचे एक नेते पाशा पटेल ह्यांच्या आग्रहापोटी प्रकाशित केली. या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत परुळकरांनी लिहिलेली पहिली दोन वाक्ये अशी आहेत :

प्रस्तावना 'अर्पण' करण्याची पद्धत नाही, तरीपण मी हे दोन शब्द श्री. माधवराव खंडेराव मोरे ह्या बहाद्दर शेतकऱ्याला अर्पण करू इच्छितो. शेतकरी संघटनेच्या चळवळीतून 'पुढारी'पण मिळवलेल्या मंडळींना माधवराव खंडेराव मोरेंची जरी विस्मृती झाली असली, तरी त्यांनी संघटना उभी करण्यासाठी जे अथक परिश्रम घेतले आणि जो प्रचंड त्याग केला त्याचे मी आणि सरोजा साक्षीदार आहोत.

 शरद आणि लीला जोशी यांच्याप्रमाणेच विजय आणि सरोजा परुळकर यांनाही दोन मुली. दोन्ही कुटुंबे काही वर्षे परदेशात राहून नंतर पुण्यात स्थिरावलेली. साहजिकच त्यांच्यात बरीच कौटुंबिक जवळीक निर्माण झाली. पुढे काळाच्या ओघात व्यक्तिशः जोशी व परुळकर यांच्यात पूर्वीसारखा संपर्क राहिला नाही; काहीसा दुरावा निर्माण झाला असेही म्हणता येईल. लीलाताई ३१ ऑक्टोबर १९८२ रोजी गेल्या. परुळकर ३ जून २००० रोजी गेले. पण जोशी यांच्या मुली मात्र परदेशात स्थायिक झाल्यावरही परुळकर दांपत्याशी व नंतर सरोजा परुळकरांशी जवळचा संपर्क ठेवून होत्या. ह्या चरित्राच्या संदर्भात सरोजाताईंनी प्रस्तुत

१५२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा