पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेखकाला भरपूर वेळ दिला व दुर्मिळ अशी माहिती पुरवली, जी शरद जोशी यांना एक व्यक्ती म्हणून समजून घेताना उपयुक्त वाटली; पुस्तकासाठी अनेक छायाचित्रेही त्यांनी दिली.

 ज्याची सगळ्यांना प्रतीक्षा होती तो दिवस एकदाचा उजाडला. दहा नोव्हेंबरच्या सकाळीच हजारो शेतकऱ्यांच्या मोर्च्याने आंदोलनाला सुरुवात झाली. निफाड-नाशिक रस्त्यावरच्या आडगावजवळ मोर्चा येताच पोलिसांनी तो अडवला व जोशी, मोरे आणि बोरास्ते यांना अटक केली. प्रल्हाद पाटील त्यांच्या हाती लागले नाहीत, नियोजनपूर्वक भूमिगत राहून त्यांनी आंदोलनाचे यज्ञकुंड धगधगते ठेवले.
 प्रमुख नेते तुरुंगात गेल्यामुळे आंदोलन आपोआपच नि यकी बनेल व बारगळेल असा शासनाचा कयास होता. पण सर्वसामान्य शेतकरीदेखील आता इतका पेटून उठला होता, की त्याच्या अंतःप्रेरणेनेच तो रस्त्यावर उतरला. 'दामाशिवाय घाम नाही, तीनशेशिवाय ऊस नाही' अशा जोरदार घोषणा देत गावोगावी शेतकरी रस्त्यावर येत होते आणि स्वतःला अटक करवून घेत होते. पहिल्याच दिवशी पंचवीस हजार शेतकरी मुंबई-आग्रा रस्त्यावर उतरले. नाशिकच्या आडगावपासून ते मालेगावपुढील झोडगे गावापर्यंत आग्रा रोड बंद पडला. पिंपळगाव, मंगरूळफाटा, सौंदाणे वगैरे अनेक गावांमधील शेतकरी आपापल्या बैलगाड्यांसह अंथरूणपांघरूण व भाकऱ्या घेऊन महामार्गावर ठिय्या देऊन बसले व त्यांनी महामार्ग अडवून धरला. पुढल्या तीन-चार दिवसांतच त्यांची संख्या दीड-दोन लाखांवर पोचली. पुढले सलग १९ दिवस ही गर्दी कायम होती. सुमारे शंभर ते सव्वाशे किलोमीटरचा रस्ता आंदोलकांनी अडवून धरला होता.
 ही अगदी अकल्पित अशीच घटना होती. मुंबई-आग्रा महामार्ग १० ते १४ नोव्हेंबर असे सलग चार दिवस व पुढेही ठिकठिकाणी २९ नोव्हेंबरपर्यंत बंद राहिला. ह्या महामार्गाला इतकी विश्रांती तो बनला तेव्हापासून कधीच मिळाली नव्हती! आंदोलनाची तीव्रता सर्वांत जास्त बागलाण तालुक्यात होती. त्याच्याच जोडीने कोपरगाव, सिन्नर, नाशिक, निफाड, कळवण, चांदवड, मालेगाव व साक्री इथले आंदोलन विशेष तीव्र होते. आंदोलनात एकूण ३१,००० शेतकरी तुरुंगात गेले. इतक्या मोठ्या प्रमाणावर आजवर ह्या देशात कुठेच शेतकरी आंदोलन झाले नव्हते.
 हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांनी बळाचा अतिरेकी वापर केला. तो उघड करणारे एक दृश्य चितारताना 'योद्धा शेतकरी'मध्ये (पृष्ठ १३२-३) परुळकर लिहितात,

पहाटे सहा वाजता मी शरद जोशींच्याबरोबर पिंपळगाव बसवंतहून निघालो. सोनसमार्गे आम्ही मंगरूळफाट्याच्या दिशेने चाललो होतो. फाट्याच्या अर्धापाऊण किलोमीटर अलीकडेच एक भयानक दृश्य नजरेस पडलं. एसआरपींकडून काठ्यांनी झोडपले गेलेले, बुटांनी तुडवले गेलेले चार-पाच हजार शेतकरी गुरांप्रमाणे ओरडत रानोमाळ धावत सुटले होते. मी युद्धाचे अनेक प्रसंग पाहिले आहेत; पण

उसाचे रणकंदन १५३