पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चाकणला धाव घेतली. 'मला न विचारता, न सांगता तुम्ही असं एकदम उपोषण सुरू करताच कसे?' हा त्यांचा स्वाभाविक प्रश्न होता. कशीबशी जोशींनी पत्नीची समजूत काढली. बऱ्याच वर्षांनंतर ह्या घटनेकडे मागे वळून बघताना जोशी म्हणाले,

 "सेनापती स्वतः जेव्हा रणांगणात उतरतो, आपला स्वतःचा जीव पणाला लावतो, तेव्हाच त्याचे सैनिक स्वतः लढायला तयार होतात. त्या वेळी माझ्या पोटातली तिडीकच अशी होती, की तिथे बाजारात बसल्याबसल्याच मी बेमुदत उपोषण करायचं ठरवलं. हा काही खूप साधकबाधक विचार करून घेतलेला निर्णय नव्हता. त्यापूर्वी मी आयुष्यात कधीही उपोषण वगैरे काही केलं नव्हतं. घरातही मी एकदाही उपास वगैरे केलेला नाही. एका तिरीमिरीतच मी तो निर्णय घेतला व लगेच उपोषणाला बसलोसुद्धा. एका अर्थाने माझी ती सत्त्वपरीक्षा होती. स्वतःच्या जिवाची काहीही पर्वा न करता मी ह्या आंदोलनात पडलो आहे, ह्याची त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांची खात्री झाली. त्यानंतरही मी स्वतः जो धोका पत्करायला तयार नव्हतो, तो धोका पत्करायला मी माझ्या कार्यकर्त्यांना कधीही भरीस घातलं नाही. त्यांनी जे भोगलं ते सर्व मी स्वतःही त्यांच्याआधी भोगलं. त्यामुळेच हे शेतकरी आंदोलन उभं राहू शकलं."

 जोशी यांचे उपोषण चालू असताना १० मार्च ते १६ मार्च निघोजे गावच्या शेतकऱ्यांनी एक अभिनव प्रकार केला. गावचे सरपंच वसंतराव येळवंडे यांचा त्यात पुढाकार होता. गावातले शंभरएक शेतकरी आपापल्या बैलगाड्या घेऊन छोट्या छोट्या गटांनी निघाले. साधारण दोन-तीन किलोमीटरचा तो रस्ता होता. वाटेत त्यांचे भजन-कीर्तन सारखे चालूच होते. आपण कुठल्यातरी लग्नाला वहाड घेऊन चाललो आहोत, असे त्यांनी इतरांना व पोलिसांना भासवले. रात्रीच्या काळोखात आपापल्या बैलगाड्या त्यांनी पुणे-नाशिक रस्त्यावर आणून उभ्या केल्या, त्या बैलगाड्यांना मारके बैल बांधले व 'रास्ता रोको' सुरू केले. ह्या शेतकऱ्यांचा उत्साह खूप मोठा होता. ह्या वृषभदलापुढे पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. त्यांना कसे हटवायचे व रस्ता मोकळा करायचा हे पोलिसांना कळेना. ह्या निघोजेकर मंडळींची आणखी एक भन्नाट कल्पना होती. हजार बैलगाड्या घेऊन असेच भल्या पहाटे पुण्यात शिरायचे आणि पुण्यातला सगळ्यात गर्दीचा असा अख्खा लक्ष्मी रोड बंद करून टाकायचा! त्याप्रमाणे आसपासचे शेतकरी चारेकशे बैलगाड्या घेऊन चाकणला दाखलदेखील झाले होते. पण आंदोलनात आणखी कटकटी निर्माण व्हायला नकोत, म्हणून कुणीतरी निघोजेकरांची कशीबशी समजूत घातली आणि हा अतिप्रसंग टाळला.

 पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग बंद पडल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. हजारो ट्रक अडकून पडले होते. आंदोलनाचे पडसाद पार दिल्लीपर्यंत उमटले. १५ मार्च रोजी लोकसभेत शासनातर्फे निवेदन करण्यात आले, की नाफेडला रुपये ४५ ते ७० प्रती क्विटल ह्या दराने कांदा खरेदी करायचे आदेश देण्यात आले आहेत. संघटनेची मागणी बहुतांशी मंजूर झाली आहे म्हणून जोशींनी आंदोलन मागे घेतले. १६ मार्च रोजी अशा प्रकारे रस्ता रोकोची यशस्वी सांगता झाली व त्याचदिवशी जोशींनी आपले आदले आठ दिवस चालू असलेले उपोषण सोडले.

चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी१३५