पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ह्या आंदोलनाची वृत्तपत्रांनी बऱ्यापैकी दाखल घेतली; आधीच्या दोन आंदोलनांकडे त्यांनी तसे दुर्लक्षच केले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनाची प्रथमच राज्यभर चर्चा सुरू झाली.

 'आम्ही कांदा खरेदी ३० जूनपर्यंत चालू ठेवणार आहोत, त्यामळे शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजारपेठेत आणण्याची घाई करू नये. आपल्या घरीच तो नीट साठवावा, निवडावा आणि सोयीनुसार बाजारपेठेत आणावा, असे एक निवेदन नाफेडने काढले होते. किंबहुना वारकरीमध्ये अर्धे पान जाहिरात म्हणून ते प्रसिद्धही केले गेले होते. पण प्रत्यक्षात २३ एप्रिल रोजीच नाफेडने कांदाखरेदी बंद केली व त्याविरुद्ध जोशींनी आपले दुसरे बेमुदत उपोषण सुरू केले. ही घटना १ मेची.

३ मे रोजी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून जोशींना पोलिसांनी पकडले व पुण्याला ससून हॉस्पिटलला हलवले. जोशी यांच्या आठवणीप्रमाणे अजित निंबाळकर हे तेव्हा पुण्याचे कलेक्टर होते व आंदोलनात त्यांनी बरेच लक्ष घातले होते. हॉस्पिटलमध्ये जोशींना चांगली सेवा मिळेल याची त्यांनी तजवीज केली होती. पण वैद्यकीय उपचारांना जोशींनी साफ नकार दिला. “माझे उपोषण म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न नाही. त्यामुळे ज्या आरोपावरून मला पकडले गेले आहे, तो आरोप मुळातच अगदी चुकीचा आहे," असे त्यांनी कोर्टात सांगितले. त्या मुद्द्यावर पुढे बरेच महिने चर्चा होत राहिली.

 यावेळी बरेच शेतकरी आपापल्या मालासह चाकणच्या बाजारसमितीसमोर ठिय्या देऊन होते, जोशींच्या आदेशाप्रमाणे त्यांनी माल विकला मात्र नव्हता. एक दिवस दुपारी अचानक हवा पावसाळी झाली. पाऊस सुरू झाला तर कांदा भिजेल, त्याचा चिखल होईल व सगळा माल अक्षरशः पाण्यात जाईल अशी भीती साहजिकच काही शेतकऱ्यांना वाटली. आंदोलन फोडायला उत्सुक असलेले काही फितूर होतेच. त्यांनी 'कशाला या जोशींच्या नादी लागता! आत्ताची वेळ येईल त्या भावाला कांदा विकून टाकू, मग पुढच्या वेळेला बघू आंदोलनाचं काय करायचं ते, अशी कुजबुज सुरू केली. बरेच शेतकरी गोंधळात पडले. सच्चे कार्यकर्ते जोशींच्या मागे होते. पण मालाचे नकसान होईल ही भीती त्यांनादेखील होतीच, शेतकरी संघटनेच्या दृष्टीने हा अगदी कसोटीचा क्षण होता.

 अशावेळी लीलाताई आंदोलनाच्या स्थळी आल्या. आल्या-आल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली की, "एवढा आजचा दिवस आम्हाला आमचा कांदा विकून टाकायची परवानगी द्या. पुढच्या वेळेला आम्ही शेवटपर्यंत कळ काढू."

 त्यावेळी चाकण बाजारपेठेत जमलेल्या शेतकऱ्यांसमोर लीलाताईंनी खूप झुंझार भाषण केले. त्या म्हणाल्या,

 "ज्या कोणाला आपला कांदा विकावा असं वाटत असेल, त्याने तो खुशाल विकावा. पण सर्वच्या सर्व शेतकऱ्यांनी जरी हे आंदोलन सोडायचं ठरवलं, तरी ह्या कामासाठी माझ्या नवऱ्याने सुरू केलेलं उपोषण त्याने सोडावं असं मी मुळीच म्हणणार नाही! माझ्या कुंकवाचा बळी पडला तरी चालेल, पण मी आता माघार घेणार नाही. इतकंच नव्हे तर माझा नवरा,

१३६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा