पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचार केला होता हे त्यातून जाणवते.
 या पहिल्या अंकाच्या तिसऱ्या पानावर कांद्याचा लढा हा स्वतः शरद जोशींनी लिहिलेला लेख आहे. संपूर्ण अंकातला हा एकमेव मोठा लेख आहे व तो त्यांचा आहे. पुढे 'शेतकरी संघटक' नावाने जे पाक्षिक संघटनेचे मुखपत्र म्हणून बरीच वर्षे चालवले गेले, त्यातही मुख्य लेखन हे बहुतेकदा जोशी यांचेच होते व मुखपत्राचे आणि संघटनेचेही हे एकचालकानुवर्तीय स्वरूप पहिल्यापासूनचेच आहे हेही हा अंक वाचताना लक्षात येते.
 या पहिल्याच चार-पानी अंकाचे चौथे संपूर्ण पान आठ छोट्या जाहिरातींनी भरलेले आहे व ह्या सर्व जाहिराती त्यांच्या संपर्कात आलेल्या चाकणमधील लहान लहान व्यावसायिकांच्या व व्यापाऱ्यांच्या आहेत. त्यांच्या शुभेच्छा त्यावेळी व नंतरही शेतकरी संघटनेला व शरद जोशी यांना होत्या; जोशींनीही कधी उद्योजकतेला विरोध केलेला नाही हे लक्षात येते.
 किरकोळ अंकाची किंमत ३० पैसे, तसेच वार्षिक वर्गणी रुपये १५ ह्याच्याबरोबरच तहहयात वर्गणी रुपये १५० हेदेखील छापलेले आहे. याचाच अर्थ हे केवळ तात्कालिक गरजा भागवणारे साप्ताहिक नसून ते वर्षानुवर्षे चालू राहावे, अशी जोशी यांची त्यावेळी तरी कल्पना होती हे जाणवते. जिथे वितरक व प्रतिनिधी नेमणे आहे अशा दहा गावांची यादीही अंकात आहे. संपादक म्हणून शरद जोशी यांचे तर कार्यकारी संपादक म्हणून बाबूलाल परदेशी यांचे नाव शेवटी छापले आहे. पत्तादेखील परदेशी यांच्या चाकण प्रिंटींग प्रेसचाच आहे.
 “माझ्यासारख्या नास्तिकाला वारकरी हे नाव पसंत नव्हते," असे जोशी यांनी म्हटले आहे. पुढच्याच वर्षी जोशी यांचा ज्या विजय परुळकर यांच्याशी निकटचा संबंध आला, त्यांनी "वारकरी म्हणजे 'वारकरी; अन्याय करणाऱ्यावर वार करणारा" अशी त्याची फोड केली होती व ते जोशींना खूप आवडले होते; मनात काहीशी डाचणारी अप्रस्तुत नावाबद्दलची खंत त्यामुळे दूर झाली!

 अंकाची जुळणी चालू असतानाच एकीकडे प्रकाशन समारंभाची तयारी सुरू झाली. एव्हाना ऑक्टोबरचा शेवटचा आठवडादेखील संपत आला होता. जेमतेम चार दिवस हातात होते. चाकण बाजारात एक लहानसा मांडव घातला गेला. बाबूलालनी आपल्या छापखान्यात घाईघाईने काही पत्रिका छापल्या, वाटल्या, पोस्टर्स छापली. एक अशी कल्पना निघाली, की समारंभात जे सामील होतील त्यांना लावायला एखादा बिल्ला तयार करावा, म्हणजे मग भविष्यात संघटनेचे कार्यकर्ते कोण आहेत हे ओळखणे कोणालाही सुलभ होईल. बिल्ला कसा असावा ह्याविषयी काही कल्पना मनात स्पष्ट होत्या. लाल रंगाचा गोल बिल्ला व त्यावर पांढऱ्या अक्षरात शेतकरी संघटना' ही अक्षरे. (लाल पार्श्वभूमी व त्यावर पांढरा क्रॉस ह्या स्वित्झर्लंडच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाइनशी असलेले ह्याचे साम्य लक्षणीय आहे.) पण अल्पावधीत असे बिल्ले कोण करून देणार हा प्रश्नच होता. बाबूलाल ह्यांचे डॉ. रमेशचंद्र नावाचे एक पुण्यात राहणारे मित्र होते. समाजवादी पक्षाचे ते स्थानिक संघटक होते. बिल्ले कुठे मिळतील ह्याची चौकशी करायला मंडळी त्यांच्या घरी गेली. दुर्दैवाने ते घरी नव्हते. निराश होऊन जोशी व बाबूलाल बाहेर पडले तेव्हा फाटकातच रमेशचंद्रांचे भाऊ भेटले. 'काय

चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी१२३