पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लुटालुटी" ह्या रामदासस्वामींच्या अगदी समर्पक अशा ओळींनी संपादकीय सुरू झाले होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापले त्यावेळची परिस्थिती आणि महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती यांचे वर्णन करून दोन्हीमधील साधर्म्य त्यात दाखवले होते.

 शेतकरी संघटनेचा प्रवास कसा सुरू झाला हे वारकरीच्या सुरुवातीच्या अंकांवरून अभ्यासकांना जाणवेल. उदाहरणार्थ, पहिला अंक :
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची निर्भीड चर्चा करणारे शेतकरी संघटनेचे मुखपत्र' हे पहिल्याच पानावर शीर्षस्थानी ठळक अक्षरांत छापले आहे. शेतकरी संघटनेचा १९७९-१९८०चा दोनकलमी कार्यक्रमही ठळक अक्षरांत पहिल्याच पानावर छापला आहे. तो आहे :
१) चाकण व संबंधित बाजारपेठांत कांदा, बटाटा व भुईमूग यांचे भाव क्विटलमागे रुपये ५०, रुपये १०० व रुपये २५०च्या खाली जाऊ न देणे.
२) गावोगावी संघटना बांधून पुढील लढ्याची तयारी करणे.
दुसऱ्या पानावर शेतकरी संघटनेच्या तीन घोषणा छापल्या आहेत -

  • शेतकरी तितुका एक एक!
  • जय किसान! जय जवान!
  • भारत झिंदाबाद!

 त्याच पानावर आसखेड धरण आणि भामनहर रस्ता यांसाठी संघटनेतर्फे डिसेंबर महिन्यात भरवल्या जाणाऱ्या एका परिषदेची माहिती देणारी चौकट आहे. शेतकऱ्यांनी काय करावे म्हणून 'सहा मार्गदर्शक तत्त्वे ह्याच पानावर आहेत. शेतकरी संघटनेचा मुख्य भर शेतीमालास रास्त भाव मिळवून देण्यावर आहे व म्हणून संघटनेने ठरवून दिलेल्या किमान किमतीच्या खाली आपला शेतीमाल विकू नका हे त्यातील प्रमुख तत्त्व आहे. याच पानावर ते सेवादलाच्या शाखेत जायचे तेव्हापासून ज्यांच्याविषयी जोशींना कायम आदर होता, त्या सानेगुरुजींचे किसानांना उद्देशून लिहिलेले एक चार कडव्यांचे गीत संपूर्ण छापले आहे. 'शेतकरी संघटनेचे गीत' म्हणन स्वीकारण्यात आलेल्या या गीताची सरुवात होती : उठू दे देश, पेटू दे देश; येथून तेथून सारा, पेटू दे देश.
 या गीतातील विचार शेतकरी संघटनेच्या एकूण विचारांशी इतके जुळणारे आहेत, की आज इतक्या वर्षांनी ते वाचताना या साम्याचे खूप आश्चर्य वाटते. विशेषतः ‘घाम गळे तुमचा, हरामाला दाम' ह्या ओळीत 'भीक नको, हवे घामाचे दाम' ह्या शेतकरी संघटनेच्या प्रसिद्ध घोषणेचे बीज दडलेले आहे हे कोणालाही जाणवावे. गीताच्यावर सानेगुरुजींचे छायाचित्र छापलेले आहे व संपूर्ण अंकातील समकालीन व्यक्तीचे असे ते एकमेव छायाचित्र आहे.

 याच पानावर कवितेखाली 'कलावंत शेतकऱ्यांना आवाहन' या मथळ्याखाली एक चौकट आहे व तिच्यात संघटनेला प्रचारासाठी एक शाहीर पथक लगेच तयार करायचे आहे आणि त्यासाठी गायक, वादक, कवी यांची, तसेच नट व चित्रकार यांचीही गरज असल्याचे छापले आहे. संघटनेच्या प्रसारासाठी जोशी यांनी सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या माध्यमांचा

१२२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा