पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काम होतं?' असे त्यांनी विचारल्यावर जोशींनी आपली गरज त्यांना सांगितली. “माझा प्लास्टिक मोल्डिंगचा एक छोटा कारखाना आहे. मी तुम्हाला चोवीस तासांत तसे प्लास्टिकचे बिल्ले बनवून देतो," ते म्हणाले.
 'चला, प्लास्टिक तर प्लास्टिक, पण आपली आत्ताची गरज तर भागली,' म्हणत जोशींनी सुटकेचा सुस्कारा सोडला. एक अडचण तरी दूर झाली. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी त्यांनी बिल्ले दिलेदेखील हे विशेष. पुढे प्लास्टिकचे हे बिल्ले बदलन पत्र्याचे बिल्ले तयार केले गेले, पण डिझाइन तेच राहिले. हा बिल्ला पुढे शेतकरी संघटनेची निशाणी म्हणून देशभर प्रसिद्ध पावला.
 दोन नोव्हेंबरपर्यंत खुर्च्या, टेबल, बॅनर्स, हारतुरे ह्याची व्यवस्था झाली. कार्यक्रमाची रूपरेखा ठरली. ओळखीतून कोणीतरी एक लाउडस्पीकर मिळवला. अध्यक्ष कोणाला बोलवायचे हा प्रश्नच होता. कारण संघटना त्यावेळी अगदी नगण्य होती आणि राजकारण्यांशी फटकूनच राहिली होती. त्यामुळे खासदार, आमदार वगैरे मंडळी सोडाच, साधा ग्रामपंचायतीचा सभापतीदेखील प्रकाशनासाठी यायची शक्यता नव्हती.
 शेवटी भामनेर खोऱ्यातील एका गावाच्या पंचायत समितीचा एक सदस्य अध्यक्ष म्हणून नक्की केला. 'आगामी भामनेर सडकेच्या आंदोलनात तो उपयोगी पडेल' ही जोशींची कल्पना. बाबूलाल अधिक व्यवहारी होते. तो निदान वारकरीचा आजीव सदस्यतर होईल' ही त्यांची कल्पना. प्रत्यक्षात त्याने आजीव सदस्य व्हायचे कबूलदेखील केले; पण दिले मात्र फक्त रुपये ५०! उरलेले १०० राहूनच गेले!

 'वारकरी'चे प्रकाशन झाले आणि योगायोगाने त्याच आठवड्यात आंदोलनाचा परत एक प्रसंग आला. आधीचे काही महिने नाफेडने खरेदी थांबवली होती व सर्व व्यवहार व्यापाऱ्यांच्याच हातात पुन्हा गेला होता. त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. त्यांच्या सभा-निदर्शने सुरू झाली. शेवटी ७ नोव्हेंबरपासून नाफेडने पुन्हा एकदा खरेदी सुरू केली. असे नेहमीच होत असे – नाफेड कधी खरेदी करायचे, मध्येच ती थांबवायचे. ह्यावेळी त्यांनी खरेदी सुरू करताना कांद्याचा भाव क्विटलमागे पूर्वी ४५ ते ६० असा होता, तो कमी करून सरसकट ४०वर आणला.
 त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांची बाजारसमितीसमोर निदर्शने सुरू झाली. शेवटी १४ नोव्हेंबर रोजी नाफेडतर्फे भाव पूर्ववत केले गेले. संघटनेच्या कार्यालयात ह्या निमिताने अनेक शेतकरी येत गेले व त्यांना वारकरीचे अंकदेखील वाटले गेले. वारकरीची गरज लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी ह्या आंदोलनाची मदत झाली.

 शेतकऱ्यांना रुची वाटेल अशा बातम्या अंकात असायच्या. उदाहरणार्थ, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार त्याच सुमारास अरब देशांचा दौरा करून आले होते. त्याविषयीच्या बातमीत म्हटले आहे,

१२४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा