पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१०७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


नाही. रात्री अडीचतीन वाजता मात्र झोप खाडकन खुले. पुढे झोपणंच अशक्य होई. कपाळाला हात लावून मी स्वतःलाच विचारी, 'मी पाहतो आहे ते खरं की स्वप्न?' आसपास शांतपणे झोपलेल्या लीला, श्रेया, गौरीकडे पाहून पोटात गलबलून यायचं. यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा मला काय अधिकार होता? (अंगारमळा, पृष्ठ ८-१०)

  शाळेतील तो कार्यक्रम संपवून घरी परतेस्तोवर रात्र झाली होती. तिथेच इतके सगळे खाणेपिणे झाले होते, की आता घरी गेल्यावर जेवायचा काही प्रश्नच नव्हता. आज कधी नव्हे ती मुलींची बडबड सारखी चालू होती; संध्याकाळच्या आठवणी काढून त्या सारख्या खिदळत होत्या. खूप दिवसांनी त्यांचा असा चिवचिवाट ऐकताना, त्यांचे असे फुललेले चेहरे पाहताना आईवडलांनाही खुप आनंद होत होता. जोशींना तर वाटत होते, ह्यांना इतक्या आनंदात असलेले आपण भारतात परतल्यावर आज प्रथमच पाहतो आहोत! आज इतक्या दिवसांनी प्रथमच त्यांना एक वडील म्हणून इतके समाधान वाटत होते.
  एका तृप्तीतच ते पलंगावर आडवे झाले, शेजारचा बेडलँप मालवला. जरा वेळ त्यांना पेंग आली. पण मग अचानक खडबडन जाग आल्यासारखे झाले. डोळ्यासमोर कालची ती लहान मुलगी उभी राहिली. शेतमजुराची मुलगी. अलीकडे शेतीच्या कामामुळे त्यांना खूपदा आंबेठाणला अंगारमळ्यात रात्रीही मुक्काम करावा लागे. तिथल्या त्या छोट्या तकलादू घरात. घरासमोरच्या पडवीत आपल्या शेतावर काम करणाऱ्या शेतमजुरांच्या मुलांसाठी ते रात्री सगळी कामे उरकल्यावर शिकवणी घेत. त्यांना लिहायला वाचायला शिकवत. खरेतर दिवसभराच्या श्रमांमुळे ते तोवर अगदी गळून गेलेले असत, पण तरीही ह्या मुलांनी शिकले पाहिजे असे त्यांना खूप वाटे. म्हणूनच त्यांची ही धडपड असे. त्या मुलीच्या हातात पाटी व पेन्सील होती. जोशींनी भिंतीवरच्या फळ्यावर काढलेली अक्षरे ती आपल्या पाटीवर अलगद लिहीत होती, पुन्हा पुन्हा गिरवत होती. तिची एकाग्रता, तन्मयता, शिकण्याची हौस ह्या सगळ्याचे प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. ते पाहून जोशींना अगदी गहिवरून आले. खूप वेळ ते तिच्याकडे रोखून पाहत होते.
  आत्ता पुन्हा एकदा तिचा तो चेहरा त्यांच्या डोळ्यांपुढे उभा राहिला. बघता बघता मनात विचारचक्र फिरू लागले. आंबेठाणमधले ते शेतमजुरांचे जग आणि इथले जग यांची मन तुलना करू लागले.

  इथली गुटगुटीत, गोरीगोमटी, नवेकोरे कपडे घातलेली, बोर्नव्हीटा-हॉर्लिक्सच्या जाहिरातीतल्यासारखी दिसणारी गोंडस मुले आणि तिथली रोगजर्जर, किडकिडीत, खरजेने भरलेली, ढगळ फाटकेतुटके कपडे घातलेली मुले.

  इथली ती सेंट जोसेफसारखी भव्य शाळा आणि तिथली ती अर्धमोडल्या भिंतींची, गळकी, एकमास्तरी चावडीवरची शाळा.

मातीत पाय रोवताना१०७