पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१०६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


शंभरच्या नोटा अगदी सहज काढत होत्या. त्यांच्या गोंगाटाने आणि हसण्याखिदळण्याने, इकडेतिकडे बागडण्याने तो सगळा परिसर भरून गेला होता. एरव्ही अशा शाळांमधली शिस्त मोठी कडक. पण आज तिथल्या शिक्षकांनी मुलींना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले. वातावरणात उत्साह, उल्हास दाटलेला. पालकही गप्पांमध्ये रंगलेले.
 जोशी स्वतः त्या सगळ्यापासून अलिप्त होते, नुसतेच आजूबाजूला पाहत होते. तसे सरकारी नोकरीत व परदेशात त्यांनी वैभव भरपूर उपभोगले होते; पैशाचे त्यांना अप्रूप नव्हते. पण आज मात्र त्यांना हे सारे बघताना वैषम्य वाटत होते. वाटले, 'ह्या सगळ्या मंडळींमध्ये बहुधा आपणच सर्वांत गरीब असू. आपल्या मुली म्हणजे श्रीमंत शाळेतल्या गरीब मुली!'
 त्यांना असे वाटण्याचे बरेच प्रसंग गेल्या काही दिवसांत आले होते. नुकतेच मोठ्या श्रेयाला काश्मीरला ट्रीपला जायचे होते, वर्गातल्या सगळ्याच मुली जाणार होत्या. पण त्यासाठी लागणारे पाचशे रुपये त्यावेळी जोशींकडे नव्हते. 'तुला यंदा ट्रीपला पाठवणं नाही झेपणार मला' असे तिला सांगताना त्यांच्या हृदयाला जणू सहस्र इंगळ्या डसल्या होत्या. स्वित्झर्लंडमध्ये असताना असा प्रसंग कधीच आला नव्हता; मुलींची प्रत्येक हौस पुरी करणे तिथल्या पगारात त्यांना सहज शक्य झाले होते.
 वडलांच्या हट्टामुळे मुलींना भारतात यावे लागले होते आणि मग त्यांचे सगळे जीवनच एकदम बदलून गेले होते. इथली शाळा, शिक्षक, मैत्रिणी, शेजारी, हवापाणी, रस्ते, रहदारी, इथले एकूण सामाजिक वातावरण सगळे तिथल्यापेक्षा खूप वेगळे होते. बर्नमध्ये शिकत असताना दोन वर्षांपूर्वीच श्रेयाने कोपर्निकसवर फ्रेंचमध्ये निबंध लिहिला होता; इथल्या शाळेत मात्र तिला गमभन गिरवायला लागले होते! होणाऱ्या खर्चावरून, वाढणाऱ्या कर्जावरून घरी खूपदा भांडणे व्हायची. तशा दोघीही मुली समजूतदार होत्या, आईवडलांची परिस्थिती त्यांना समजत होती. शक्यतो त्या काही मागतच नसत. त्यांच्या चेहऱ्यावर अकालीच उमटलेल्या त्या गांभीर्याच्या छटा जोशींना अधिकच बोचायच्या. घरातल्या प्रत्येकालाच खरे तर वातावरणातला तणाव जाणवत होता. आपला अनेक वर्षे कष्ट घेऊन केलेला स्टॅम्प्सचा संग्रहही त्यांना विकावा लागला होता व ते तर जोशींना खूपच जिव्हारी लागले होते. लीलाताईंची स्थिती काही वेगळी नव्हती. त्याही बदललेल्या प्रापंचिक परिस्थितीशी जुळवून घ्यायचा आटोकाट प्रयत्न करत होत्या. पण सगळे तसे जडच होते. आपल्या तत्कालीन मानसिकतेचे नेमके वर्णन जोशींनी केले आहे. ते लिहितात :

तिच्या मनात खरोखरच काय चाललं होतं कोण जाणे! माझी ही उडी खरं म्हटलं तर तिच्यावरही अन्यायच होता. आयएएस पास झालेल्या, हुशार, कर्तबगार समजल्या जाणाऱ्या नवऱ्याच्या हाती तिने हात दिला, तो सुखासमाधानाच्या चौकोनी कुटुंबाच्या राज्यात चिरकाल राज्य करण्यासाठी. पुढे हे असं काही घडेल याची तिला तरी काय कल्पना होती? ... झोपी जाताना चिंतांची तोटी बंद करून झोपी जायचं, ही माझी फार जुनी कला आहे. झोप लागताना सगळ्या चिंतांचा आणि तणावांचा काही त्रास व्हायचा

१०६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा