पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१०८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 इथल्या शाळेतला तो मोठा थोरला स्विमिंग पूल आणि तिथल्या कोरड्या पडलेल्या विहिरी.
 इथला तो शाळेसमोरचा रस्ता; विद्यापीठ चौकापासून थेट एनडीएपर्यंत गेलेला वीसएक किलोमीटरचा रस्ता. गेल्याच वर्षी केवळ एक दिवसाकरिता राष्ट्रपती येणार होते, म्हणून तो उत्तम असतानाही पुन्हा एकदा डांबर ओतून, काही लाख रुपये खर्चुन अधिक गुळगुळीत करण्यात आला होता. आणि गावातला तो दहा-बारा वर्षांपूर्वी दुष्काळाच्या वेळी श्रमदानाने बांधलेला खडीचा कच्चा रस्ता; ज्याच्यावरून चालताना घोटे बुडतील इतका चिखल प्रत्येक मोठ्या पावसानंतर हमखास साचायचा.
 वाटले, पुणे आणि आंबेठाण म्हणजे जणू दोन वेगवेगळे देश आहेत – एकमेकांपासून इतके वेगळे, की त्यांच्यात काही नातेच नसावे.
 स्वित्झर्लंडसारख्या अत्यंत प्रगत देशात राहून भारतात परतल्यावर आपला देश आणि तो देश यांच्यातील तफावत किती प्रचंड आहे, याची जोशींना कल्पना होतीच, पण आंबेठाणसारख्या ग्रामीण भागात गेले वर्षभर शेती केल्यानंतर, तिथली परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर, जोशींच्या लक्षात आले, की पुण्यासारखा शहरी भारत आणि तिथून अवघ्या चाळीस किलोमीटरवरचा आंबेठाणसारखा ग्रामीण भारत यांच्यातील दरी ही स्वित्झर्लंड आणि भारत यांच्यातल्या दरीपेक्षाही कितीतरी जास्त भीषण आहे.
 झेंडा एकच आहे, राष्ट्रपती एकच आहेत, राष्ट्रगीत एकच आहे - वरवरच्या खुणा सगळ्या एकच आहेत; परंतु आर्थिकदृष्ट्या ह्या देशाचे दोन भाग पडले आहेत. एक भाग हा दुसऱ्या भागाच्या शोषणावरच जगतो आहे, आणि सतत जास्तीतजास्त शोषण करत चालला आहे आणि दुसऱ्या भागाचे मात्र शोषणच होत आहे.
 शोषक म्हणजे 'इंडिया' आणि शोषित म्हणजे 'भारत'.

 'इंडिया' आणि 'भारत' यांच्यातील या जमीनअस्मानाच्या फरकाचे मूळ कारणही त्यांच्या लक्षात आले होते. किंबहुना, ते सतत मनात सलतच होते. ते होते त्यांची आणि त्यांच्यासारख्या सर्वच शेतकऱ्यांची नुकसानीतली शेती. महिन्यापूर्वीच त्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेला कांदा विकला होता. अवघ्या २० रुपये क्विटल या भावाने. त्यांच्या चारपाच महिन्यांच्या घामाचा बाजारपेठेतला भाव तेवढाच होता-२० पैसे किलो! आणि इथल्या आजच्या समारंभात तर केवळ खाण्यापिण्यावर शंभराची नोट उडाली होती!

 तसे पाहिले तर भारतातल्या आत्यंतिक विषमतेची असली मांडणी त्यांना अपरिचित नव्हती. कम्युनिस्ट विचारवंत ती वर्षानुवर्षे करत आले होते. मुंबईत मलबारहिलवर १९६५च्या सुमारास जेव्हा उषाकिरण ही भारतातील पहिली सव्वीस मजली गगनचुंबी इमारत बांधली गेली, तेव्हा ते मुंबईतच नोकरी करत होते आणि उषाकिरण बिल्डिंग आणि शेजारीच मलबारहिलच्या डोंगरउतारावर असलेल्या झोपड्या ह्यांची एकत्रित छायाचित्रे अनेक ठिकाणी प्रकाशित झालेली त्यांनी पाहिली होती. पण जोशींना त्यावेळी तो केवळ एक 'प्रचार'

१०८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा