पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पण दुर्दैवाने प्रथमपासूनच पोल्ट्रीच्या या व्यवसायात अनेक अडचणी येत गेल्या. एकदा वीज गेल्यामुळे शीतगृह बंद पडले व त्यात साठवून ठेवलेला माल नष्ट झाला. शीतगृहमालकाने वस्तुरूपात थोडी भरपाई दिली, पण तरीही नुकसान बरेच झाले. एकदा मुंगुसांनी कसातरी पिंजऱ्यात प्रवेश केला आणि दोन-अडीच हजार कोंबड्यांपैकी पाचेकशे खाऊन फस्त केल्या. असे एकापाठोपाठ एक धक्के बसत गेले. दरम्यान कर्जाचा बोजा वाढतच चालला. शेतीतही कर्ज साठत होते आणि पोल्ट्रीतही साठत होते.

 साधारण ह्याच सुमाराची एक घटना. जोशी यांच्या वैचारिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी त्या दिवशी गाठला.
 पुण्यातील पाषाण विभाग, आणि विशेषतः आज ज्याला नेकलेस रोड म्हणतात तो त्यातला भाग, त्या काळी आत्तापेक्षाही अधिक निवांत होता. स्वच्छ रस्ते, ओळीनी लावलेले वृक्ष, मागे दिसणाऱ्या डोंगररांगा. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, डीआरडीओ यांसारख्या काही नामांकित संस्थांची भव्य आवारे इथेच आहेत. त्यांच्याआधीच लागते सेंट जोसेफ शाळा. शाळेच्या प्रशस्त आवारात जोशींची गाडी शिरली, तेव्हा दुपारचे साधारण तीन वाजले होते. सोबत लीलाताई आणि श्रेया व गौरीही होत्या. दोघी ह्याच शाळेत शिकत होत्या आणि शाळेच्याच वार्षिक स्नेहसंमेलनासाठी म्हणून जोशी कुटुंब तिथे आले होते. ही शाळा मुलींची. त्याच मिशनची मुलांसाठीची शाळा, लॉयोला हायस्कूल, शेजारीच आहे.
 ख्रिस्ती मिशनऱ्यांनी कोणे एके काळी गरीब विद्यार्थ्यांसाठी म्हणून अनेक देशांत शाळा सुरू केल्या. जगभरातून देणग्या मिळवून उत्कृष्ट इमारती उभारल्या. ग्रंथालये, प्रयोगशाळा, क्रीडांगणे, वसतिगृहे, भरपूर मोकळी जागा यांची तजवीज केली. देशोदेशींच्या मिशनरी स्त्रिया व पुरुष अतिशय कळकळीने व सेवावृत्तीने शिकवण्याचे काम करीत. साहजिकच बघता बघता या शाळांचा खूप दर्जेदार म्हणून सर्वत्र लौकिक पसरला. पण म्हणूनच अहमहमिकेने अभिजनवर्ग आपली मुले इथेच घालू लागला आणि त्यामुळे मूळ गरिबांसाठीच्या या शाळा काळाच्या ओघात उच्चभ्रूच्या शाळा म्हणूनच स्थिरावल्या. विशिष्ट परिस्थितीमुळे संस्थांना मूळ उद्देशापासून अगदी वेगळे स्वरूप कसे प्राप्त होत जाते ह्याचे हे एक ठळक उदाहरण आहे.

 शाळेच्या आवारात पार्किंगसाठी भरपूर जागा असूनही गाड्यांची गचडी झाली होती. इथल्या बहतेक विद्यार्थिनी गाडीवाल्या! त्यात पुन्हा आज खास दिवस. कशीबशी आपली गाडी पार्क करून जोशी कुटुंब सजवलेल्या मांडवात शिरले. सगळीकडे अगदी सणासुदीचे वातावरण होते. सगळ्या मुली फॅशनेबल कपड्यांत आलेल्या. त्यांचे पालक तसेच नटूनथटून आलेले. त्यांनी तसे यावे, हा आग्रह प्रत्येक मुलीचा असायचाच! आपल्या आईवडलांमुळे इतर मुलींसमोर आपली 'पोझिशन डाऊन' होऊ नये यासाठीची ही त्यांची खबरदारी! सगळीकडे पताका, झिरमिळ्या, फुगे. नाच, गाणी, करमणुकीचे कार्यक्रम. बाजूला ओळीने उभारलेले वेगवेगळे खाद्यपदार्थ व इतर वस्तू विकणाऱ्यांचे स्टॉल्स. त्यांच्याभोवती उडालेली मुलींची झुंबड. आपल्याला हवे ते विकत घेण्यासाठी त्या पर्समधून वा खिशातून पन्नास

मातीत पाय रोवताना१०५