मी हे बोलूनही दाखवले होते. त्यांच्या बुद्धीच्या झेपेला कोणताच अडसर नव्हता; पण मराठी भाषा आणि ज्ञानेश्वर हे त्याला अपवाद. हे विषय निघाले, की एरवी प्रकांड कठोर तर्क आणि कर्मठ व्यवहार मांडणारे आपटे एकदम वेगळे दिसू लागत. त्यांचा चेहरा बदले, मोहरा बदले, भाषा तर पार पालटून जाई.
आपटे हे एक अजब रसायन होते. ते पटकन निघून गेले. शेवटचे दर्शनही घेता आले नाही.
अशी मनस्वी माणसे मला मनापासून आवडतात. मनाला भावलेल्या गोष्टींकरिता सर्वस्व उधळून टाकण्याचा बेदरकार धाडसीपणा फक्त तारुण्यातच येऊ शकतो. ज्या काळात तरुण माणसेही म्हातारी बनू लागली आहेत, त्या काळात मनोहरपंतांनी त्यांचा मनस्वीपणा जपला आणि आपल्या एका दिवटीने ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या कार्यकर्त्यांत एक दीपमाला तयार केली. त्यांच्या स्वतंत्रतेच्या आग्रहाने माझ्यासारख्या किती लोकांना मानसिक आधार मिळाला असेल याची गणती करणे कठीण आहे. मनोहरपंत गेले आणि माझ्यातीलच एक भाग मरून गेला असे वाटले.
(शेतकरी संघटक, २१ मे २००२)
■ ■
अंगारमळा । ९५