पान:अंगारमळा (Angarmala).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

absolutely' या दोन उक्तींवर प्रखर विश्वास असल्यामुळे आमच्या दोघांच्या भेटीगाठीत चर्चा, विचारविनिमय व्हायचा तो स्वतंत्र व्यवस्था प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आवश्यक बारकाव्यांचा.

 असल्या बारकाव्यांच्या बाबतीत आपटे 'वल्ली' म्हणावे इतके लोकविलक्षण होते. त्यांच्यासमोर एखादा प्रश्न मांडला, की खटकाही न दाबता एखादी लोकविलक्षण कल्पना ऐकायला मिळे.

 नैसर्गिक खतामुतांचा पुरवठा शेतीसाठी पुरेसा होत नाही, त्यामुळे बहुसंख्य जनता शौचासाठी बहिर्दिशेला जाणारी असूनही खताचा तुटवडा पडतो असे मी म्हटल्यावर आपट्यांची योजना दोन दिवसांत तयार. प्रत्येक बसच्या थांब्यावर आणि इतरत्र जागोजागी स्वच्छतागृहे उभी करावीत. प्रवेशशुल्क घेऊन त्यांचा उपयोग करू द्यावा; एकत्र झालेले खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे यासाठी त्यांची योजना तयार. 'सुलभ शौचालयां'नी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवून दाखविली आहे.

 पूर्वी मी टपाल खात्यात प्रशासकीय सेवेत होतो. टपालाच्या हाताळणीच्या गणिती मांडणीचा मी आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त अभ्यासक आहे. भारतातील पिनकोड प्रणाली तयार करण्यात माझा महत्त्वाचा हातभार लागलेला होता. या विषयावर चर्चा चालू असतांना आपट्यांनी म्हटले, "या पिनकोडची इतकी माथेकूट कशाला? साऱ्या पृथ्वीच्या पाठीवर अचूक अक्षांश आणि रेखांश दिला, की कोणत्याही माणसाचा नेमका पत्ता कळून जातो.' टपालव्यवस्था अक्षांशरेखांशांच्या पत्त्यावर करण्याची त्यांच्या बुद्धीची एक चमक.

 अशा योजनेतील अडचणी मी त्यांना समजावून सांगितल्या; पण मी मांडलेल्या अडचणींना गणकयंत्राच्या युगात काही महत्त्व नाही अशी त्यांची खात्री.

 गणकयंत्र हा आपट्यांचा खास आवडीचा विषय. विजय भटकर आणि सी-डॅकचे इतर तज्ज्ञ यांच्याबरोबर त्यांनी देशी भाषांच्या वापरासाठी अनेक सॉफ्टवेअर सिस्टम्स् उभ्या केल्या. नॅशलन इन्फरमॅटिक्स सेंटरचा माझा संबंध आला तो मनोहर आपट्यांच्या मध्यस्थीनेच.

 असल्या लोकविलक्षण प्रज्ञावंताच्या मनात स्वदेश, महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी संत यांच्याबद्दल, अतिरेकी म्हणावा इतका जिव्हाळा होता. या कोणत्याच गोष्टीबद्दल मला फारशी कदर नाही. ज्ञानेश्वर विज्ञापीठाच्या पदविदान समारंभात पसायदान म्हटले जाते आणि त्यावेळी सर्व सभा उठून उभी राहते हे मला हास्यास्पद वाटते. मनोहरपंतांना

अंगारमळा । ९४