पान:अंगारमळा (Angarmala).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असल्यासारखे ऊर दाटून आला.

 दुर्गाबाई समाजवादाच्या दुष्टचक्रात अडकून गेल्या.६ मे रोजी निधन पावलेले मनोहर आपटे यांनी हा धोका ओळखून या दुष्टचक्राकडे चुकून पाहिलेही नाही.

 पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरू म्हणून मनोहरपंत प्रसिद्ध आहेत. यापलीकडे त्यांची कोणाला फारशी आठवण राहील अशी चिन्हे दिसत नाहीत. मनोहर आपटे हे माझ्या आयुष्यात मला भेटलेल्या लोकविलक्षण अशा पाचसहा व्यक्तिमत्त्वापैकी एक. सरकारी मान्यतेची अपेक्षा न बाळगणारे एक विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मला फार फार पूर्वी बोलून दाखविली होती. लोकविलक्षण कल्पना मांडण्यात मीही काही कच्च्या गुरूचा चेला नाही; पण, मलाही, नोकरीसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांचे छापखाने झालेली विद्यापीठे सरकारी मान्यतेखेरीज उभी राहू शकतील हे पटेना. समाजवाद संपला, सरकारशाही संपली म्हणजे शिक्षणक्षेत्रातील सरकारचा हस्तक्षेप संपेल, बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्था उभी राहील आणि बनावट प्रमाणपत्रांवर आपल्या पित्त्यांची नोकरभरती करणे शक्य राहणार नाही; अशी नोकरदारांची भरती केली तर मालकाचा व्यवसाय खड्डयात जाईल हे सगळे मीही मानीत होतो.

 खुलेपणाच्या विचाराचा प्रचार मी शेतकरी संघटनेमार्फत करीत राहिलो. स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून केला; पण खुल्या व्यवस्थेतील शासननिरपेक्ष संस्था उभी करणे आणि चालवून दाखविणे मला जमले नाही.

 ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या प्रकल्पाबद्दल मी शंका व्यक्त केल्यानंतर वर्षभरातच आपटे भेटले आणि विद्यापीठ चालू झाल्याचे त्यांनी सांगितले. जागेची अडचण पुण्याच्या विधी महाविद्यालयातील वापरात न राहिलेली जागा उपयोगात आणून सोडविली. अध्यापकवर्ग मिळविला. प्रयोगशाळा, कार्यशाळा यांच्या सोयी परिचितांतील उद्योजकांच्या चालत्याबोलत्या संस्थांत केल्या. ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर विद्यार्थ्यांना पुण्यातील उद्योजकांनी अहमहमिकेने नोकरीस लावून घेतले. शासननिरपेक्ष विद्यापीठाचा प्रयोग कला, वाणिज्य, विज्ञान या क्षेत्रात तुलनेने फारसा दुष्कर नाही. अभियांत्रिकी क्षेत्रात तो आपट्यांनी यशस्वी करून दाखविला; पण वैद्यकीय क्षेत्राचे काय? आपट्यांच्या योजनेला येथे विरोध फक्त सरकारचाच नाही तर वैद्यकीय संस्थांचाही. आपट्यांवरील विश्वासाने विद्यार्थी आले. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानेश्वर विद्यपीठाचा वैद्यकीय अभ्यासक्रम चालविण्याचा हक्कही मानला. उन्हाळी सुट्या चालू झाल्या, की पुण्याच्या आसपास वसलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी मी मध्यस्थी करावी म्हणून

अंगारमळा । ९२