पान:अंगारमळा (Angarmala).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाल्या तेव्हा, आजकाल ध्येयनिष्ठेच्या वारेमाप आरोळ्या ठोकणारे शरद पवार एका प्रचारसभेत म्हणाले, "विरोधकांना आम्ही तुरुंगातून सोडले आहे ते तुरुंगाची रंगरंगोटी करायला सवड मिळावी म्हणून. निवडणुका आटोपल्या म्हणजे सारे विरोधक पुन्हा तुरुंगात जातील." सारा हिंदुस्थान निर्वीर्य झालेला. त्या वेळी एक वीरांगना उठली, कऱ्हाड येथील मराठी साहित्य संमेलनात बोलली, एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रभर गावोगाव जाऊन आणीबाणीविरोधी प्रचाराची रणधुमाळी दुर्गाबाईंनी उठविली. महाराष्ट्रात काँग्रेसचा पाडाव झाला त्याचे प्रमुख श्रेय 'पुलं'बरोबर दुर्गाबाईंना द्यायला पाहिजे.

 वेगवेगळ्या संस्था दुर्गाबाईंना निमंत्रण देऊन त्यांचे भाषण घडवून आणण्यासाठी उत्सुक होत्या. अडचण एवढीच, की बाईंच्या भाषणाचा विषय जाहीर करताना अगदी अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारच्या राजकीय संदर्भाचा उल्लेख करण्याची कोणाची हिंमत होत नसे. दुर्गाबाईंचे भाषण आणि विषय 'आणीबाणी' किंवा 'सध्याची राजकीय परिस्थिती' असे प्रसिद्ध झाले, की भाषणाच्या आधीच नियोजकांची उचलबांगडी तुरुंगात होण्याची निश्चिंती. मग, नियोजक, बाईंच्या भाषणाचा विषय, दुरान्वयानेही राजकारणाशी सबंध लागणार नाही अशा पद्धतीने देत. बाईंना विचारीत, "तुमच्या भाषणाचा विषय 'असा असा' लिहिला तर चालेल ?" बाईंचे उत्तर सर्वदूर मशहूर झाले. "तुम्ही विषय कोणताही द्या, मी आणीबाणीवरच बोलणार आहे."

 दुर्गाबाई, दुर्दैवाने, महाराष्ट्रातील समाजवाद्यांच्या दलदलीत अडकल्या. कारुण्यभावनेने प्रत्येक माणसाला जगण्याची आणि व्यक्तिविकासाची संपूर्ण संधी मिळाली पाहिजे एवढ्या मूलभूत भावनेतून 'कसणाऱ्याची धरणी आणि श्रमणाऱ्याची गिरणी' यापलीकडे जाऊन राष्ट्रीयीकरण, शहरीकरण, औद्योगिकीकरण अशा अमानुष कार्यक्रमांपर्यंत समाजवादी पोहोचले आणि दुर्गाबाईंची मोठी घुसमट झाली. 'पुलं'प्रमाणे त्यांनीही आणीबाणीच्या काळात मिळालेल्या तेजोवलयाचा आणि लोकप्रियतेचा हव्यास ठेवला नाही; सरळ मोकळ्या होऊन त्या आपल्या व्यासंगाच्या विषयाकडे वळल्या आणि शेवटपर्यंत कर्मयोग भावनेने ते काम करीत राहिल्या.

 बाई गेल्या, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातूनच कळाले. त्यांच्या अंत्यविधीला जाणेही शक्य झाले नाही. नामदेव ढसाळ आदी दोनचार माणसे हजर होती असे कळले. पण, आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द बाळगणाऱ्या हजारो लोकांच्या मनात एका इंग्लिश कवीच्या 'To ramparts we carry and not a horn was blown' या ओळीत म्हटल्याप्रमाणे आपल्या जीवनाच्या आदर्श बनलेल्या सेनापतीला मूठमाती देत

अंगारमळा । ९१