पान:अंगारमळा (Angarmala).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणजे व्यासंगपूर्ण माहितीचा प्रसादपूर्ण धबधबा.

 आदिवासी प्रदेशातील एका जुन्या देवळात अभ्यासाकरिता गेल्याची आठवण त्यांनी सांगितली. तेथील शंकराच्या पिंडीपुढील नंदीला स्त्रियांनी हात लावायचा नाही असा तेथील नियम; हात लावला तर बाईला मूल होत नाही अशी समजूत. कोणताही अभिनिवेश न ठेवता त्यांनी सहज म्हणून टाकले, "माझ्या बाबतीत असा काहीच धोका नसल्यामुळे मी स्पर्श केला." एका साध्या वाक्यात बाईंनी आपल्या एकाकी आयुष्याचा एखाद्या शंकराचार्यांच्या तटस्थ वृत्तीने असा काही उल्लेख केला, की साऱ्यांची मने हेलावून गेली.

 आमचे प्राचार्य एस.के. मुरंजन बँकिंग विषयातील तज्ज्ञ. दलित आणि वनवासी समाजाचा त्यांचा व्यासंग फार मोठा. या विषयावरील त्यांच्या लिखाणाकरिता ते प्रसिद्ध आहेत. भाषणानंतर बाईंचे आभार त्यांनी थोडक्यात मानले. आभाराच्या भाषणात शेवटी ते म्हणाले, "एवढी विद्वता, कर्तृत्व, प्रसाद मूर्तिमंत समोर पाहिल्यानंतर माझ्यासारख्या अश्रद्ध माणसालासुद्धा वाटून गेले, की बाईंनी आदिवासींच्या देवळातील नंदीला हात लावायला नको होता." त्या काळात असा शेरा थोडा आगतुंकच. सारी सभा हास्यकल्लोळात बुडून गेली आणि बाईंनी- त्या वेळी त्यांचे वय ४५ च्या आसपास असणार- स्त्रीसुलभ संकोच आणि कर्तन्यनिष्ठ कठोर तटस्थपणा या दोघांचे असे काही अजब मिश्रण केले, की समोर बसलेल्या तरुण विद्यार्थीविद्यार्थिनींची आयुष्ये उजळून गेली.

 आणीबाणीच्या शेवटच्या काळात मी हिंदुस्थानात परतलो. बांगलादेशच्या लढाईनंतर 'दुर्गा' म्हणून गाजलेल्या इंदिरा गांधी यांनी भ्रष्टाचार आणि सत्तापिपासा झाकण्यापोटी आणीबाणी लादली. हजारो विरोधकांना तुरुंगात डांबले. सक्तीच्या कुटुंबनियोजनासाठी सरकारी गाड्या गावोगाव फिरू लागल्या. सगळीकडे दहशतीचे वातावरण होते. मुंबईच्या विमानतळावर उतरून मी दादर स्टेशनवर पुण्याच्या गाडीत चढलो. या गाडीतील प्रवासी सतत तारस्वराने राजकारणाचा काथ्याकूट करण्याकरिता आणि चढत्या स्वरात आपली मते आग्रहाने मांडण्याकरिता प्रसिद्ध; पण त्या दिवशी कोणी एक चकार अक्षरसुद्धा बोलत नव्हते. इतर देशांतील हुकूमशहांच्या तुलनेने पाहिले तर येथील सरकारी दडपशाही अगदीच हलकीफुलकी; पण तेवढ्यानेही तमाम प्रजा भयभीत झालेली होती. वरून आलेल्या लाथा माथी झेलणे आणि खालच्या लोकांवर लाथा झाडणे हे ज्यांचे ब्रीद असे बुद्धिजीवी आणि नोकरशहा यांची तर खरोखरच पाचावर धारण बसलेली. विरोधाचा शब्दही कोणी काढण्यास तयार नाही. पुढे, आणीबाणीच्या शेवटी निवडणुका जाहीर

अंगारमळा । ९०