पान:अंगारमळा (Angarmala).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दोन मनस्वी माणसे


 महत्त्वाच्या घटना सहसा एकाकी घडत नाहीत. आनंदाच्या सुखदायक घटना 'जवापाडे' असल्यामुळे एकट्यादुकट्या फिरत असतात. मनाला चटका लावून देणाऱ्या दु:खद गोष्टी मात्र टोळीटोळीने फिरतात आणि एकदम कडाडून पडतात. 'देनेवाला जब भी देता है, पूरा छप्पर फाडके देता है,' हा अनुभव फार दुर्मिळ भाग्यवंतांना येत असेल. 'पण, पाऊस सरींनी येत नाही, मुसळधार कोसळतो - It never rains, it pours हा अनुभव अनेकांना आहे.

 ८ मे २००२ हा असाच दु:खद घटनांचा वर्षाव करणारा ठरला. एकाच दिवशी दुर्गाबाई भागवत आणि मनोहर आपटे यांच्या निधनाची बातमी कळली. दुर्गाबाई ९२ वर्षे वयाच्या झालेल्या, म्हणजे एक पिढी आधीच्या. त्यांचे जाणे समजण्यासारखे आहे. पण, मनोहर आपटे जवळपास माझ्या वयाचे. अगदी अलीकडे अलीकडेही आंबेठाणला येऊन गेलेले; आल्या आल्या घरात उपस्थित असलेल्या सर्वांच्या हाती प्रसन्न मुद्रेने एक एक गुलाबाची कळी देऊन गेलेले. मनोहरपंतांच्या मृत्यूच्या बातमीवर तर विश्वासच बसेना. आम्हा दोघांचे अनेक स्नेहसंबंधी; त्यांपैकी कोणीही अक्षरानेदखील मनोहरपंत आजारी असल्याचे कळविले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा धक्का अधिक हादरविणारा झाला.

 दुर्गाबाई भागवत आणि माझा प्रत्यक्ष परिचय अगदीच चुटपूट. सिडेनेहॅम कॉलेजात असताना मी त्यांना एका भाषणासाठी बोलाविले होते. एशियाटिक ग्रंथालयात कधी जाणे झाले तर दुर्गाबाई म्हणजे तेथील स्थावर वाचक; त्यांच्या वाचनसमाधीचा भंग करण्याची हिंमत मला कधी झाली नाही. तरीही, दुर्गाबाई हा व्यासंग, वाणीतील प्रसाद, लालित्य आणि त्याबरोबर रणदुर्गेचा लढाऊपणा यांबाबतीतला माझ्या पिढीच्या जीवनातील आदर्श.

 १९५४-५५ मध्ये आम्ही त्यांना सिडनेहॅम कॉलेजमध्ये भाषणासाठी बोलावले. मध्य प्रदेशातील एका जिल्ह्यातील आदिवासींचे जीवन, इतिहास, संस्कृती, राहणीमान यांविषयी बाई बोलल्या. रस्त्याने खाली बुंधा आणि वर हिरवळ असे दिसले, की झाड म्हणायचे इतपतच वनस्पतिसृष्टीशी संबंध असलेल्या आम्हाला बाईंनी इतक्या वेगवेगळ्या वृक्षांशी, वनस्पतींशी परिचय घडवून दिला की सारे सभागृह भारून गेले. त्यांचे भाषण

अंगारमळा । ८९