पान:अंगारमळा (Angarmala).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 थोडं नाटकी वाटेल; पण आमचं घर मोडलं तरी श्रेया, गौरी आणि मी आज शेकडो कुटुंबांत घरातल्यासारखे वावरतो.
 माझी एक आई आहे. चिकोडी तालुक्यात निपाणी आंदोलन १४ मार्च १९८१ ला चालू झाले. चार- पाच हजार शेतकरी जमतील सत्याग्रहाला अशी अपेक्षा होती. तिथे चाळीस हजारांवर शेतकरी जमले. सात आठ किलोमीटर लांबीचा पुणे-बंगळूर रस्त्याचा भाग आंदोलननगराने व्यापला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकारांबरोबर प्रत्येक गावच्या मांडवाला भेट देत निघालो. एक म्हातारीशी बाई धावत माझ्याकडे आली. उंच शिडशिडीत बांधा. जन्मभरचे कष्ट, चेहऱ्यावरच्या रेषारेषांच्या जाळ्यांत खोदलेले. मला म्हणाली, "साहेब, तुम्ही गावांतल्या माय-बहिणींना सत्याग्रहाला यायला सांगितले म्हणून आलो. नेसूचं धड नव्हतं म्हणून शेजारणी कडून लुगडं घेऊन आलो बघा." या माझ्या आईच्या घरी मी नंतर गेलो. आपल्या लेकीच्या घरून दूध आणून तिनं मला प्यायला दिलं. मला दूध पिताना पाहिलं तेव्हाच तिला समाधान वाटलं.
 पण 'त्याग' शब्दाची विदारक जाणीव प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळणं कठीण. दु:खे अगदी छोटी छोटी; पण फार टोचायची. मुलींना फ्रेंच, जर्मन, लॅटिन सोडून आता मराठी, हिंदी, इंग्रजी शिकायचं होतं. बर्नमधून निघण्यापूर्वी श्रेयानं फ्रेंचमध्ये कोपर्निकसवर निबंध लिहिला होता. ती आता 'गमभन’ गिरवायला बसली होती. मुलींना शाळेत प्रवेश मिळण्याची मोठी अडचण झाली. ओळखपाळख कुठे वापरायची नाही असा निश्चय केला होता. शिक्षण निदेशालयातल्या सामान्य कर्मचाऱ्यांपुढे रांगेत उभा राहून जात होतो. दरवाज्यापाशी बसत होतो. काही अधिकाऱ्यांची शिरजोरी पाहून वाटायचे, आता यांना आपण कोण आहोत ते सांगावं. जादूची कांडी फिरल्यासारखं काम होऊन जाईल; पण प्रत्येकवेळी मोह आवरला. रेशनदुकान, गॅस वितरक, वकील, मुख्याध्यापक सर्वांपुढे तोंड वेंगाडणे झाले. आम्ही चेहऱ्यावर कोणीच काही दाखवत नव्हतो. लीला मात्र जास्त आक्रमक बनत चालली होती. आमच्या उपक्रमाविषयी कोणी चिंता, शंका व्यक्त केली की ती त्याच्यावर तुटून पडायची. बाहेरून आमच्यातील प्रत्येकजण सगळं काही व्यवस्थित चाललं आहे असं दाखवीत होता. दुसऱ्याचा धीर तुटू नये अशी कोशीश करीत होता.

 झोपी जातांना चिंतांची तोटी बंद करून झोपी जायचं ही माझी फार जुनी कला आहे. झोप लागताना सगळ्या चिंतांचा आणि तणावांचा काही त्रास झाला नाही. रात्री अडीचतीन वाजता मात्र झोप खाडकन खुले. पुढे झोपणेच अशक्य होई. कपाळाला हात

अंगारमळा । ९