पान:अंगारमळा (Angarmala).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लावून मी स्वत:लाच विचारी, "मी पाहतो आहे ते खरं की स्वप्न?" आसपास शांतपणे झोपलेल्या लीला, श्रेया, गौरीकडे पाहून पोटात गलबलून यायचं. यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा मला काय अधिकार होता? त्याग म्हणजे रुपयापैशांचा नसतो. त्याग अशा अनेक दाहक क्षणांनी गुंफलेला असतो.

 आंबेठाण येथे शेती तर घेतली. साडेतेवीस एकर कोरडवाहू जमीन. पुण्यातल्या सिंध कॉलनीत घर घेतलं, मुलींच्या शाळेच्या सोयीने. घराचे नाव ठेवले 'मृद्गंध'. आंबेठाण या माळरानातल्या रखरखीत शेताचे नाव काय ठेवावे? मराठीतल्या कवितांत नावे शोधायची माझी जुनी सवय. केशवसुतांच्या-


 जेथे ओढे वनराजी । वृत्ती तेथे रमे माझी।
 कारण काही साक्ष तिथे । मज त्या श्रेयाची पटते।

 यावरून पहिल्यावहिल्या मुलीचे नाव ठेवले. आता कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या-

 पदोपदी पसरून निखारे, आपुल्याच हाती
 होवूनिया बेहोश धावलो, ध्येयपथावरती
 कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
 बांधू न शकलो प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
 एकच तारा समोर आणिक, पायतळी अंगार

 बस शेताचे नाव ठेवले 'अंगारमळा', या अंगाराने पुढे वणवा पेटायचा होता.


 एक जानेवारी १९७७ ला कामाला सुरुवात केली. तातडीने दोन विहिरींची कामे सुरू केली. रब्बी पिके संपल्यानंतर आमच्या भागात रोजगार नाहीच. अडीचशे तीनशे माणसे कामाला असायची. मलाही काम उरकायची घाई होतीच.खोदणे, सुरुंग लावणे, बांधकाम करणे, खरिपाची तयारी करणे अशी सगळी कामे चार एक महिन्यांत आटोपायची होती. मजुरी किमान वेतन कायद्याप्रमाणे स्त्रियांना आणि पुरुषांना सारखीच, तीन रुपये ठरवली. मला त्या वेळी मजुरी नगण्यच वाटायची; पण गावकऱ्यांत खळबळ माजली. तसे आंबेठाणमध्ये भूमिहीन कोणीच नाही; पण अजिबात दुसरीकडे मजुरीला जातच नाही अशी डझनभरसुद्धाघरे नसतील. त्यातलीच काही मंडळी भेटायला आली. उन्हाळ्याच्या दिवसांत विहिरीच्या कामाचा चालू रोज दीड रुपया होता. मी रोज वाढवला तर बाकीच्यांनी पैसे कुठून द्यावेत आणि कामे कशी करून घ्यावीत? मला त्या वेळी तरी त्यांची खरी अडचण समजली नव्हती. मी म्हटले,

अंगारमळा । १०