पान:अंगारमळा (Angarmala).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही अशी तिला खंत वाटे. हिंदुस्थानात आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल याची तिला खात्री होती, आणि जरूर पडली, तर एकटीने सगळा संसार सांभाळण्याची तिची हिंमतही होती. निदान तशी हिंमत असल्याचे ती दाखवत होती.
 तिच्या मनात खरोखरच काय चाललं होतं कोण जाणे. माझी ही उडी खरे म्हटले, तर तिच्यावरही अन्यायच होता. लग्न चारचौघांसारखं दाखवून झालेलं. माझ्या निरीश्वरवादामुळे विवाह कोणताही धार्मिक विधी न करता नोंदणी पद्धतीने झाला, एवढंच काय ते जगावेगळं लक्षण. आय.ए.एस. पास झालेल्या हुशार, कर्तबगार समजल्या जाणाऱ्या नवऱ्याच्या हाती तिने हात दिला, तो सुखासमाधानाच्या चौकोनी कुटुंबाच्या राज्यात चिरकाल राज्य करण्यासाठी. पुढं हे असं काही घडेल याची काय कल्पना?
 आपल्या संसाराचे वेगळेपण तिला लग्नानंतर फार लवकर लक्षात आलं असावं. तिनं स्वत:ला पार बदलवून टाकलं. माझी पहिली शिष्या तीच. बर्नच्या सुखसंपदेतलं माझं असमाधान तिला कळलं होतं. जानकीच्या निष्ठेने ती माझ्या मागोमाग येत होती. त्या वेळी कोणालाच ठाऊक नव्हते, की रामायणाच्या काळानंतर रावणांची संख्या फार माजली आहे आणि सीतेची शोकांतिका आता दंडकारण्यातच होते.

 सभा, भाषणांतून कोणी मी केलेल्या त्यागाचा आता उल्लेख केला म्हणजे मला हसू येतं. संघटनेच्या कामात मी काही करुणेच्या प्रेरणेने पडलेलो नाही. कोणा तळागाळातील जनसामान्यांचा उद्धार करण्याची मनिषा ठेवण्याचा उद्धटपणा माझ्याकडे नाही. या कामात मला अपरंपार आनंद मिळतो म्हणून मी हे काम करतो. आजपर्यंत हजारो शेतकरी आंदोलनात तुरुंगात गेले. कित्येकांनी लाठ्या खाल्ल्या. निपाणी भागात गेलो, तर डझनभर शेतकरी लाठ्या-गोळ्यांनी हातपाय गेलेले कुबड्या खाड्खाड् वाजवीत भेटायला येतात. बावीस घरांतली तरुण कर्ती माणसं पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडली. माझा सगळा संसार आज उजाड झाला आहे. लीला आज नाही. श्रेया, गौरीला लहानपणी कधी कोणत्या हट्टाला नाही म्हणावं लागलं नाही. आता अगदी साध्या गोष्टींकरितासुद्धा त्यांना आता हे आपल्याला परवडण्यासारखं नाही हे सांगायची वेळ येते; पण पोरी हुशार आहेत. बापावर अशी वेळ येऊच देत नाहीत. समजून घेतात. एवढं होऊनसुद्धा या कामात मला आनंद वाटतो. मग त्याग कसला? उलट, माझ्याइतकं भाग्यवान कोण? त्याग काय आजपर्यंत थोड्यांनी केला? अनेकांची बलिदानं व्यर्थ गेली. त्यांच्या नजरेला काहीसुद्धा फळ पडलं नाही. मी शेतकऱ्यांच्या ना जातीचा, ना पातीचा, ना पेशाचा. देशभरातील शेतकऱ्यांनी मला जे प्रेम दिले त्याला तोड नाही.

अंगारमळा । ८