पान:अंगारमळा (Angarmala).pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेव्हा, आम्हाला तुमचं स्वातंत्र्य नको. आम्हाला तुमचा सन्मान नको. त्याऐवजी आम्हाला तुमचं संरक्षण द्या, आमचा बचाव करा." म्हणजे कसाई बकरी घेऊन चालला आहे आणि बकरीला सुटायची संधी मिळाल्याबरोबर कसाई त्या बकरीला म्हणतो, 'कोठे जातेस पळून? बाहेर गेलीस तर तुला लांडगा खाईल. माझ्या दोरीला बांधून घे, एकदाच काय ती सुरी चालायची ती चालेल.' या पद्धतीने शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे लोक 'आमचा शेतकरी जगातल्या शेतकऱ्यांशी स्पर्धा करायला उतरणार नाही, तशी त्याची पात्रता नाही, त्यापेक्षा त्याला सरकारने संरक्षण दिले. तर त्याच्यातच आनंद मानेल' असे म्हणताना आणि त्यांच्याबरोबरीने शेतकरी संघटनेत काही काळ काढलेले कार्यकर्तेही तसेच म्हणताना पाहिल्यानंतर शेवाळेगुरुजींची स्थिती सानेगुरुजींसारखीच झाली असावी.

 तेव्हा, ही लढाई चालू ठेवणे यापलीकडे जास्त कोणती श्रद्धांजली नाही. पण, शेवाळेगुरुजींच्या मनामध्ये शतेकरी संघटनेवर नितांत निष्ठा होती. "हिंदुस्थानातील शेतकरी जगातील कोणत्याही शेतकऱ्यापेक्षा कमी नाही, हिंदुस्थानातल्यासारखा चांगला सूर्यप्रकाश कोठे नाही, हिंदुस्थानात मुबलक पाणी आहे. तेंव्हा, जगाशी टक्कर झाली तर ती टक्कर आम्ही देऊ शकतो. आम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज नाही, आमच्या हातापायात बेड्या घातल्या आहेत, त्या काढा आणि आमचा पराक्रम पहा." ही जी शेवाळेगुरुजींची निष्ठा होती, त्यातील एक कण जरी आपण आपल्या मनात बाणून येथून गेलो तर शेवाळे गुरुजी नसताना, येत्या काही काळामध्ये ज्या काही मोठ्या लढाया द्याव्या लागणार आहेत, त्यांतही आपण यशस्वी होऊ. त्यासाठी जी काही तयारी करावी लागणार आहे त्या तयारीच्या वेळी शेवाळेगुरुजींची स्मृती आपल्याला स्फूर्ती देवो आणि शेतकऱ्यांना सन्मानाने व सुखाने जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्त भाव हा एककलमी कार्यक्रम राबवण्यासाठी अधिक बळ मिळो, अशी प्रार्थना करतो.


 

(शेतकरी संघटक दि. २१ मे २००१)

■ ■  

अंगारमळा । ८८