पान:अंगारमळा (Angarmala).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ज्यामुळे त्यांना जीवन असह्य व्हावं. जर का शेवाळेगुरुजींनी केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही मला भरभरून देत असाल तर माझ्या कार्यकर्त्यांना इतकी बिकट अवस्था सोसावी लागली, अशा दुर्धर जीण्याला सामोरं जावं लागावं याची जबाबदारीही माझ्यावर येते.

 कोणताही पक्ष किंवा संघटना आपल्या कार्यकर्त्यांच्या चरितार्थाची, उपजीविकेची काहीतरी सोय करतो. मी या बाबतीत नालायक ठरलो हे कबूल करायला हवं. आपल्या कार्यकर्त्यांनी घरामध्ये सगळ्या अडचणी सोसून, धावपळ करून जर का हे काम निभावलं तरच, जशी सोन्याला आच लागली तरच त्याची परीक्षा होते तशी, खरी परीक्षा होईल आणि आपण जो काही विचार सांगायला निघालो आहोत तो लोकांपर्यंत ते पाहोचवतील असं मानायचं काही कारण नव्हतं. पण, वर्षानुवर्षे लुटल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या संघटनेला आर्थिक बळ मिळवायचं कोठून? मनात खंत वाटे. त्यावर शेवाळेगुरुजी म्हणायचे, "तुम्हाला काय वाटतं, आम्हाला तुमचे शब्द लोकांपर्यंत पाहोचवता येणार नाहीत? साधनांनी संपन्न लोक तुमच्याबरोबर येऊन भाषणं करून दाखवतील पण लोकांचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्हीमात्र लोकांसमोर तुमचे विचार ठेवले, की ते त्यांच्या मनाला भिडतात; कारण आमचं सोनं मुशीच्या आचेतून तावूनसुलाखून सिद्ध झालेलं आहे; हिणकस सोन्याला त्याची कधी बरोबरी करता येणार नाही."

 कार्यकर्त्यांच्या चरितार्थाची, उपजीविकेची काही सोय कण्याची व्यवस्था उभी करणे ही माझी जबाबदारी आहे हे खरे; पण, एक दिवस, कदाचित गोविंद गुरुजींची जागा घेईल आणि त्या वेळी तुम्हावर अशीच श्रद्धांजली वाहण्याची पाळी येईल. माझी अशी इच्छा आहे, की यापुढे जो काही चळवळीचा प्रयत्न करायचा तो आपल्या कार्यकर्त्यांनी काहीतरी खंबीर व्यवस्था करूनच चालवायचा आहे एवढाच निश्चय त्या वेळी तुम्ही करावा.

 स्वातंत्र्य मिळालं तरी सानेगुरुजी गेले. ज्या स्वातंत्र्याकरिता आपण एवढं आंदोलन केलं, त्याग केला ते हेच का स्वातंत्र्य? हा प्रश्न त्यांना टोचत असावा. मला अशी शंका येते, की गेली पंचवीस वर्षे शेतकऱ्याच्या सन्मानाकरिता आंदोलन करता करता 'केवळ आमच्या हातापायातल्या बेड्या काढा आणि मग दाखवतो आम्ही काय करू शकतो ते' या निर्धाराचा संदेश गावोगाव पोहोचविणाऱ्या शेवाळेगुरुजींना अलीकडची वर्तमानपत्रं पाहिली, कानावर ज्या बातम्या येतात त्या ऐकल्या म्हणजे खरंच दु:ख होत असावं. आम्ही शेतकऱ्यांचे पुढारी आहोत असं म्हणणारी माणसं जेव्हा म्हणू लागतात, "आपण जर का निर्यात खुली केली, आयात खुली केली तर आमचं कसं काय धड चालायचं?

अंगारमळा । ८७