पान:अंगारमळा (Angarmala).pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाणार आहे,' असा निरोप ते देऊघेऊ शकतात. अशीच संपर्क व्यवस्था बाजारपेठेच्या या घटकांमध्ये असते आणि त्यामुळेच बाजारपेठेची व्यवस्था यशस्वी होते. पण, बाजारपेठेतील तीच माहिती आकड्यांमध्ये कागदावर मांडली आणि सचिवालयात पाहोचली, की ती मेलेली असते, त्यामुळे नियोजन हे अयशस्वी होतं आणि बाजारपेठ यशस्वी होते." असा हा सिद्धांत मी समजावून सांगितला होता. गुरुजी म्हणाले, "बुलडाण्यात हेच झालं. इथं सर्व शेतकऱ्यांच्या पोटामध्ये दु:ख आहे आणि त्या दुःखावर जे औषध आहे ते तुमच्या शब्दांत सांगणारे आम्ही गेलो की प्रेमात पडलेल्या माणसाला जसं एकमेकांकडे नुसतं पाहिलं तरी मनातील विचार समजातो, तसं बुलडाण्यामध्ये आम्ही ज्या ज्या गावांत गेलो तिथं भाषणंसुद्धा निमित्तमात्र झाली. शरद जोशींची माणसं आली असं म्हटल्यानंतर डोळ्याला डोळे भिडल्यानंतर लोकांच्या लक्षात येतं, की आपण जे काही शोधत होतो ते गवसलं आणि म्हणून बुलडाण्याचे कार्यक्रम नेहमी यशस्वी होतात."

 हे साधं गूढ सांगणारा मनुष्य कोण ? अर्थशास्त्राचा पदवीधर नाही, शाळेमध्ये शिकविणारा साधा मास्तर. प्रत्यक्ष श्रीकृष्णालासुद्धा प्राकृतामध्ये अर्थ सांगणारा ज्ञानेश्वर एकच भेटला. माझं भाग्य असं, की जे काही अर्थशास्त्र मी सांगितलं ते लातूरमध्ये अर्धवट कानडी, अर्धवट मराठी,अर्धवट उर्दू अशा भाषेत सांगणारा एक 'पाशा पटेल' नावाचा ज्ञानेश्वर मला भेटला, बुलडाण्याच्या भाषेत सांगणारा एक 'गुरुजी' भेटला. प्रत्येक जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर प्रत्येक राज्यामध्ये खुल्या बाजारपेठेचं हे अत्यंत गहन अर्थशास्त्र; जेव्हा जगामध्ये कोणीही ते मानायला तयार नव्हतं, तेव्हाही सांगणारे ज्ञानेश्वर भेटले आणि तेसुद्धा भगवद्गीतेची जडजंबाळ भाषा टाकून साध्या, जनसामान्यांच्या भाषेत सांगणारे जे लोक मला भेटले त्यांत गुरुजी एक होते.

 सानेगुरुजींनाही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जीव नकोसा झाला आणि त्यांनीही विष खाऊन आत्महत्या केली. जगामध्ये सात्त्विक सात्त्विक म्हणून काही असेल, सोज्वळ सोज्वळ म्हणून काही असेल, शांत प्रकृतीचं म्हणून काही असेल तर त्या सगळ्यांची मूर्ती म्हणजे सानेगुरुजी. शेवाळेगुरुजी शांत होते. विनोदी होते; पण ते काही सानेगुरुजी नव्हते हे नक्की. या दोन भिन्न प्रकृतींच्या माणसांमध्ये एक समानता होती. साने गुरुजींची त्यांच्या कार्यावर जेवढी निष्ठा आणि प्रेम होतं, तेवढी निष्ठा आणि प्रेम, कदाचित् त्याहीपेक्षा जास्त निष्ठा आणि प्रेम शेवाळेगुरुजींनी शेतकरी संघटनेच्या कामाबद्दल बाळगली. मग प्रश्न असा पडतो, दोघांपुढेही अशी कोणती समस्या उभी राहिली, की

अंगारमळा । ८६