पान:अंगारमळा (Angarmala).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्यापासून दूर झाले होते. त्यामुळे, "सध्या बुलडाण्यात आमचं काही काम नाही, तेव्हा बुलडाण्यात काही फारसं मोठं आंदोलन होईल असं काही मला वाटत नाही." असं मी त्या अधिकाऱ्यांना म्हटलं. ते हसले; त्यांना बहुतेक त्यांच्या खात्याकडून आधी माहिती मिळाली असणार, की बुलडाण्यामध्ये फार प्रचंड आंदोलन होणार आहे आणि मी नागपूरच्या तुरुंगात गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की तेथील बराकीपैकी तीन बराकी फक्त बुलडाण्याच्या सत्याग्रहींनीच भरलेल्या आहेत. म्हणून मी नेहमी म्हणतो, की बुलडाणा हा चमत्कारांचा जिल्हा आहे.

 बुलडाण्यात असे चमत्कार कसे शक्य होतात? बुलडाण्यातील बहुतेक कार्यकर्ते स्वत:ची मोटारसायकलसुद्धा नसलेले असे आहेत; ज्या थोड्यांकडे आहेत तेसुद्धा आपल्या मोटारसायकली रॉकेलवर चालवू शकतात इतपतच आर्थिक ताकद असलेले आहेत. एखाद्या सभेसाठी, कार्यक्रमासाठी बाहेर जायला निघताना परत येईपर्यंत घरामध्ये भाकरीची सोय आहे किंवा नाही हे बायकोला विचारून घ्यावं लागतं. समोर साधनं नाहीत, हाती वर्तमानपत्रं नाहीत, हँडबिलं वाटायची म्हटली तरीसुद्धा हाती पैसे नाहीत. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत गावागावात जायचं तर हा प्रदेश कसा आहे? धड विदर्भात नाही आणि धड मराठवाड्यात नाही. त्यामुळे या जिल्ह्यातले लोक मराठवाड्यातल्या लोकांना आपले वाटत नाहीत आणि विदर्भातल्या लोकांनाही फारसे आपले वाटत नाहीत. अशा प्रदेशामध्ये अशी ही साधनरहित कार्यकर्ती मंडळी फिरतात आणि एवढं मोठं काम उभं होतं कसं काय, असा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्यावर मला एकदा शेवाळेगुरुजी म्हणाले, "तुम्ही चेष्टा करता आहात आमची. तुम्हाला माहीत नाही होय, बुलढाण्यात कसं काय काम होतं ते?" मी म्हटलं, "नाही, खरंच समजत नाही." तेव्हा ते म्हणाले, "अहो, तुम्हीच आम्हाला समजावून सांगितलं, की बाजारपेठेमध्ये व्यापारी एकत्र येतात आणि बाजारपेठेत नेमकी अशी एक किंमत ठरते, की त्या किमतीमध्ये उत्पादकांचा जेवढा मालाचा पुरवठा तेवढाच ग्राहकांच्या मागणीचा रेटा असावा अशी व्यवस्था तयार होते." खरं आहे. त्या काळच्या भाषणांमध्ये मी अर्थशास्त्रातला एक अत्यंत कठीण गणिती सिद्धांत साध्या मराठी भाषेत समजावून सांगितला होता. "एखाद्या गजबजलेल्या घरामध्ये एखादं नवविवाहित जोडपं असलं, की त्या दोघांचं ठरलेलं असतं, की सगळ्या लोकांना चुकवून जितकं जमेल तितकं कुठंतरी भेटायचं. मग, ती सगळी मंडळी हजर असतानासुद्धा डोळ्याच्या नुसत्या एका कटाक्षाने किंवा चेहऱ्यावरील एखाद्या स्नायूच्या हालचालीनेसुद्धा पाच मिनिटांनी मी अमक्या अमक्या नारळाच्या झाडाखाली

अंगारमळा । ८५