पान:अंगारमळा (Angarmala).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आता उठत नाही. तेव्हा जर का मला असं वाटलं असतं, की यापुढे आपण उठून काय करणार आहोत तर ज्यांना आपण पंचवीस वर्षे लहानाचे मोठे झालेले पाहिले त्यांची काय अवस्था झाली असती? गुरुजी बुलडाण्याचे; पण प्रत्येक जिल्ह्यात असे एकदोन तरी गुरू आहेत. त्यांच्यामुळे ही शेतकरी संघटना उभी आहे. त्यांच्यापैकी काही कार्यकर्ते माझी भेट झाली तेव्हा दहावीबारावीत शिकत होते, काही कॉलेजमध्ये जात होते. बहुतेकांची अजून लग्नं व्हायची होती. त्या सगळ्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये काम करताना, पुढे येताना मी पाहिलेले आहे. त्यांची लग्नं लागली. लग्न झाल्यानंतर त्यांच्या नवपरिणत पत्नींच्या तक्रारी मी ऐकल्या आहेत. "यांनी लग्नं कशाला केली? हे तर सारखे शेतकरी संघटनेच्या कामासाठी गावोगाव धावत असतात. घरसंसार कसा काय व्हायचा?" त्यांची समजूत घालण्याचंही काम मी केलं आहे आणि ही अशी मुलं डोळ्यसमोर गेलेली पहण्याकरिताच जर आयुष्य राहिलेलं असेल तर त्या आयुष्यात काही फारसा अर्थ नाही असं मला शेवाळेगुरुजींच्या वृद्ध आईचं सांत्वन करताना खरोखरच वाटलं.  शेवाळेगुरुजींच्या आठवणी सांगा असं मी इथं जमलेल्या कार्यकर्त्यांना म्हटलं. कारण श्रद्धांजलीच्या भाषणात महात्मा, कार्यकर्ता, निष्ठावान वगैरे शब्द वापरले म्हणजे त्या शब्दांतून माणसाच्या अंतर्मनाचा काही फारसा परिचय होत नाही. सर्वांनी अनेक आठवणी सांगितल्या; पण गंभीरपणे काम करणारे, गावात जाऊन दवंडी पिटण्यापासून, सतरंज्या घालण्यापासून, लाऊडस्पीकर्स जोडण्यापासून शेवटचं भाषण करून पुन्हा घोषणाही देणारे शेवाळेगुरुजी हे स्वभावाने गोड, विनोदी, चेष्टेखोर, मिश्किल होते. हा अनुभव मला आला आहे; दुसऱ्या कोणाला आला किंवा नाही कोणास ठाऊक?

 मी बुलडाण्यात आलो म्हणजे नेहमी म्हणतो, की हा बुलडाणा जिल्हा म्हणजे एक चमत्कार आहे. १९८५ मध्ये कापसाचं आंदोलन सुरू व्हायचं होतं तेव्हा सीआयडीचे एक साहेब वर्ध्याला मला भेटायला आले. त्यांनी विचारले, की उद्यापासून तुमचा 'रास्ता रोको' चालू होणार तर कोणकोणत्या जिल्ह्यांत किती लोक रस्त्यावर येतील याचा अंदाज सांगा. आम्हांला निदान तुरुंगाची व्यवस्था करायला पाहिजे. मग मी त्यांना चंद्रपूरपासून सुरुवात करून प्रत्येक जिल्ह्याचे अंदाज सांगू लागलो. सगळं सांगून झाल्यानंतर ते मला विचारू लागले, "बुलडाण्याचं काय? तुम्ही बुलडाण्याचं नाव नाही घेतलं." त्या वेळी बुलडाण्याची परिस्थिती अशी होती, की १९८० मध्ये ज्यांनी या जिल्ह्यात काम सुरू केलं होतं ते निवडणुकीच्या काळात काही वादविवाद झाल्यामुळे

अंगारमळा । ८४