१ अंगारमळा
१९७६ च्या मे महिन्यात पहिल्याच तारखेला आम्ही हिंदुस्थानात परतलो. श्रेया आणि गौरी दोन्ही मुलींना खरं म्हणजे बर्न सोडल्याचं दु:ख होतं. "तिथेच राहावयाचं ठरवलं आहे, चला परत." म्हटलं असतं तर दोघींनीही 'हुप्पी' म्हणून आनंदाच्या आरोळ्या ठोकल्या असत्या, पण पोरी आपल्या बापालां पक्कं ओळखत होत्या. आता परत जाणे नाही हे त्यांना उमगले होते. अगदी समजायला लागल्यापासून त्या दोघीही स्वित्झर्लंडमध्येच वाढलेल्या. तसं त्यांचं सगळं विश्व तिथलंच.
मायदेशाबद्दल साहजिकच त्यांचं मत बरं नव्हतं. १९७० मध्ये तीन महिन्यांची रजा घेऊन आम्ही एकदा परत आलो होतो. त्यांचं देशाविषयी चांगलं मत व्हावं याकरिता अगदी दिल्ली, सिमला, आग्रा, पुणे असा कार्यक्रम आखला होता. दिल्ली ते सिमला जायला मुद्दाम 'डिलक्स' बस घेतली होती. वाटेत जाताना बेफाम पाऊस सुरू झाला. त्या आरामगाडीच्या छपरातूनही धो धो पाणी आत येत होते. सगळे भिजून चिंब झालो. थंडीने काकडून गेलो. चंडीगड अगदी फ्रेंच स्थापत्यशास्त्रज्ञ कुर्वीसिऐची कलाकृती म्हणून अभिमानाने दाखवले. बसस्थानकावरील स्वच्छतागृह मुलींनी पाहिले आणि त्यांचा जीव घाबरा झाल्याचे मला जाणवले. शक्य असते, तर त्याच दिवशी विमान पकडून त्या परत बर्नला गेल्या असत्या.
त्यांची शाळा, मित्र-मैत्रिणी, फ्रेंच भाषा, बर्फावरचे खेळ सगळे सगळे मागे टाकून त्या निघाल्या होत्या. आईबापांखेरीज विश्व नसलेल्या त्या अजाण पोरींवर खरं म्हणजे आम्ही केवढा जुलूम चालवला होता. गौरी काहीच बोलत नव्हती. श्रेयाला जाण मोठी. वातावरणात काहीतरी ताण आहे हे तिला कळलं होतं आणि काहीतरी गमतीचं बोलून, निदान बोलतं राहून ती ताण कमी करण्याचा प्रयत्न करू पाहत होती.
लीलाही तशी गप्पच होती. मायदेशी परत येऊन कोरडवाहू शेती करायची या योजनेबद्दल गेली चार वर्षे आम्ही चर्चा करीत होतो. "शेती करायची, तर भरपूर पाण्याची करावी, शेती आणि गरिबी यांचा संबंध बागायती शेतीच्या प्रयोगातसुद्धा कळू शकेल," अशी तिची सूचना होती. आता उडी मारली म्हटल्यावर तिच्याही मनावर दडपण होतेच, पण बर्नला तशी ती कंटाळली होती. एम्.ए.ला पहिली आलेली, गणकयंत्राचे विशेष ज्ञान, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन या भाषांवर प्रभुत्व. पण बर्नला त्याचा काहीच उपयोग होत
अंगारमळा । ७