पान:अंगारमळा (Angarmala).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चाकणच्या परिसरात षट्कर्णी झाल्या होत्या. त्या काळाचे बाबूलाल पुढे वर्णन करी, "साहेब म्हणजे काय थाट होता! सिगरेट घ्यायलासुद्धा गाडीतून उतरायचे नाहीत. खिशातून हात काढून पैसे द्यायचे आणि पाकिट घ्यायचे." सुरवातीला तरी हा 'फॉरेन रिटर्ड'चा दबदबा असावा. निवडणुकीच्या काळात चांगली ओळख झाली. मामा निवडून येणार अशी आमची खात्री होतीच. ते निवडून आले, की इतर आमदारासारखे होऊ द्यायचे नाही. सगळ्या खेड तालुक्याची परिपूर्ण विकासाची योजना तयार करून त्याच्या अंमजबजावणींची जबाबदारी आम्ही तिघांनी घ्यायची. त्यात चाकणचे अप्पा देशमुखही सामील झाले.

 माझ्या शेतीवर त्या वेळी विहिरीचे काम चालू होते. आंबेठाणला त्या वेळी वीज नव्हती. त्यामुळे डिझेल इंजिन व पंप वापरावे लागत. अप्पांचे चाकणला इंजिन दुरुस्तीचे छोटेसे वर्कशॉप होते. सायकलचे पंक्चर काढण्याच्या दुकानापासून सुरवात केलेले चाकणमधील एक अप्पा देशमुख आणि बाबूभाई शहा. तोपर्यंत बाबूभाई गडगंज श्रीमंत झाले होते. पुढारी झाले होते. अप्पांची प्रगती सुखवस्तू पण अंगमेहनत करणाऱ्या दुकानदारापर्यंतच झाली होती. अप्पांनाही वाचा सरस्वतीचे वरदान होते. खरे म्हटले तर पाचजणांत समानता काही नव्हती. मी उच्चविद्याविभूषित, परदेशात जाऊन आलेला, सुखवस्तू. बाकीच्यांतला बाबूलाल बी.ए. पास, एलएल.बी.ची एखादी टर्म भरलेला, बाकीचे शाळेचा डाग लागलेले. गोपाळ तुकारामांचा लेखकू जगनाडे यांचा वंशज.शंकरराव भाजीची विक्री, अडत, ट्रक क्लिनर, ट्रक ड्रायव्हर अशा अनेक व्यवसायांतून निघालेले. मामांमुळे समाजवादी चळवळीतही आलेले.

 बाबूलालचा चाकणमध्ये छापखाना होता. आमची बैठक त्या छापखान्यात किंवा अप्पा देशमुखच्या दुकानात. साधा ट्रेडलचा छापखाना, छपाईचे काम यायचे ते हँडबिलांचे किंवा लग्नपत्रिकांचे. बाबूलालचा कारभार तसा गबाळग्रंथी आणि अस्ताव्यस्त. छपाईच्या कामात मजकुराची दुरुस्ती गिऱ्हाईक कधी करून देत नसे. खिळे जुळाऱ्याचे शुद्धलेखन मग मुद्राराक्षसाचे थैमान घाली. आम्ही छापखान्यात गप्पा छाटत बसलो असताना अनेकवेळा गिऱ्हाईक यायचे, छपाईच्या किंवा ठरलेल्या वेळी पत्रिका छापून तयार न झाल्याबद्दल तक्रारी घेऊन. बाबूलालचे उत्तर ठरलेले, "झाल्या दोनचार चुका म्हणून काय बिघडले? लग्न कुणाचे आहे, कुठे आहे, वधूवरांचे नाव ठीक आहे ना?" उशिराने त्रस्त झालेल्या गिऱ्हाइकाला बाबूलालचे उत्तर, 'पुष्कळ छापखान्यात तर पत्रिका मुलाच्या बारशाच्या वेळीच आईबापांच्या हाती पडतात.' गिऱ्हाईक फारच तंडायला लागले तर

अंगारमळा । ७४