पान:अंगारमळा (Angarmala).pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बायकोवर खेकसला. गेल्या पाचसहा वर्षात तिसऱ्यांदा 'ही गाठभेट अखेरचीच' अशी मनाशी खूणगाठ बांधत मी निरोप घेतला. वर्धा मुक्कामी २३ मे २००४ रोजी म्हात्रे सरांचा फोन आला - 'आज पहाटे चार वाजता बाबूलाल गेला.'

 आयुष्यात काही माणसांची जवळीक अशी साधली जाते, की तिची सुरवात कोठून झाली हे लक्षातच राहत नाही. अगदी पहिल्यापासून ही ओळख आहेच अशी भावना राहते. नंतर कालमानाप्रमाणे भेटीगाठी विरळ होत चालल्या तरी जवळिकीची भावना अबाधितच राहते.

 बाबूलालची आणि माझी ओळख पहिल्यापासूनची नाही हे उघडच आहे. मी आंबेठाणला येऊन शेतकरी बनलो, चाकणला जाऊयेऊ लागलो. त्याच्या आधीचा काही परिचय असण्याची शक्यता नाही. १९७७ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना चाकणचे मामा शिंदे आमदारकीसाठी उभे होते. मामा शिंदे ही चाकणमधील एक संस्थाच आहे. 'चाकणचे सानेगुरुजी' म्हटले तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची पर्याप्त कल्पना येऊन जाते. त्यांनी खरे म्हणजे निवडणुकीच्या फंदात पडायलाच नको होते; पण निवडणुकीच्या या भोवऱ्यात नि:शंकपणे पाण्यात पाहेणारे किती जीव खेचले जातात! त्यांतलेच एक मामा. तसा त्या वेळी मामांचा आणि माझा परिचय चुटपुटताच होता. मी जुना सेवादलाचा आणि मामाही सेवादलाचे. एवढाच काय तो बादरायणी संबंध. पण, मामांनी फॉर्म भरला आणि पहिल्याच दिवसापासून मी त्यांना सांगितले, "माझी जीप, तिचे डिझेल आणि मी ड्रायव्हर तुमच्या कामासाठी हजर आहोत.' प्रचाराचा सगळा काळ पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत मी मामांबरोबर फिरलो. पुष्कळ अनुभव गाठीस जमला.

 हा काळ असा, की माझे नावही कुणाला माहीत नव्हते. निवडणुकीच्या सभांमध्ये चाकणच्या गोपाळ जगनाडेंच्या १२-१४ वर्षांच्या मुलाचेही भाषण होई; पण मी सहसा स्टेजवरही नसे. या निवडणुकीच्या मोहिमेतच बाबूलाल परदेशी, शंकरराव वाघ, गोपाळ जगनाडे हे सारे मावळे भेटले. दिवसभर गाडीच्या स्टिअरिंगवर मी आणि मागेपुढे बसलेले हे मावळे. त्यांच्याकडून साऱ्या परिसरातील नेत्यांच्या कथाकहाण्या ऐकायला मिळत. शेतीतले काटे तोपर्यंत मला खुपू लागले होते; पण दु:खांची पुरी समज काही आली नव्हती. जेवढी आली होती तेवढे मी बोले; शास्त्र कमी, अभिनिवेश जास्त असेच असणार.

 पण, नुकताच परिसरात आलेला शरद जोशी या मावळ्यांना खूप भावला. माझे शेतीविषयीचे बोलणे हे त्याचे कारण नसावे. मी त्या वेळी नुकताच परदेशातून आलेलो. स्वित्झर्लंडची 'शायनिंग' अजून शिल्लक होती. माझ्या गतवैभवाच्या पुष्कळ कंड्या

अंगारमळा । ७३