पान:अंगारमळा (Angarmala).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझ्यावेळचे सिडनेहॅमचे प्राचार्य अत्यंत आदरणीय आणि व्यासंगी. अमेरिकेच्या अध्यक्षांनीही त्यांना सल्ला देण्यासाठी बोलावले होते. त्यांनी एकदा मुंबईच्या शेअर बाजारात पैसे गुंतवले आणि सगळे घालवले. अर्थशास्त्राच्या गुणवत्ता आणि फलनिष्पत्ती यांच्या आधाराने अमदनी करून देण्याचा एक चांगला मार्ग सोबतच्या व्याख्यात्यांमुळे मला सुचला. नोकरीला लागताना एक भांडवली रक्कम प्रत्येक अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाला द्यावी. पगारवाढ, बढती यांचा संबंध पोपटपंची, प्रबंध लिखाण, पुस्तके यांच्याशी नसावा. मुळात दिलेली भांडवली रक्कम बाजारात गुंतवून त्याच्यातून निघणाऱ्या उत्पन्नातून उपजीविका चालविणे कोणाही सच्च्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाला सहज शक्य व्हावे.

 मोठ्या धारिष्ट्याने ही कल्पना मी सभेत मांडली. एक प्राध्यापिका म्हणाली, 'असे उत्पन्न मिळाले तर आम्ही नोकऱ्या सोडून देऊ.' बरोबरचे व्याख्याते म्हणाले, "औषधावाचून खोकला गेला!"

 ज्या ज्ञानसंपादनाच्या वैशिष्ट्यांमुळे मानवाने चराचर विश्वावर आपली अधिसत्ता स्थापन केली आहे, त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी उभ्या राहिलेल्या शिक्षणक्षेत्राची होत असलेली घसरण आणि त्याबद्दल समाजाची अनास्था ही मोठी चिंतेची बाब आहे.

 

(शेतकरी संघटक, ६ व २१ सप्टेंबर २००३)

■ ■ 

अंगारमळा । ५६