सर्व अविज्ञा.
प्राध्यापक मंडळी गडबडून गेली, परीक्षेकरितातरी या पुस्तकांचा मान राखा म्हणू लागली. पुस्तकी विद्येविरुद्ध बंड उभे राहिले तर आपल्या नोकऱ्यांचे काय याची चिंता त्यांना पडली असावी. 'सरकार' ही संस्थाच दिवाळ्यात निघू लागल्यानंतर अर्थमंत्री होण्यातही कोणाला फारसे स्वारस्य राहिले नाही, हे उघड आहे.
माझा हल्ला पुरा नव्हता म्हणून की काय, दुसरे एक व्याख्यातेही उभे ठाकले. शेअर बाजारातील घडामोडी या विषयातील तज्ज्ञ म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. गुंतवणुकीसंबंधी सल्लागार म्हणून ते काम करतात. शिवाय, हर्षद मेहता, गुजाराथमधील सहकारी बँका अशी घोटाळ्यांची प्रकरणे तयार झाली की चौकशीसाठी त्यांना आग्रहाने निमंत्रण जाते. थोडक्यात, गुंतवणूकक्षेत्रातील सर्व गुन्ह्यांचे चतुर डिटेक्टिव्ह 'धनंजय' अशी त्यांची प्रसिद्धी आहे. त्यांनीही आपल्या भाषणात आपल्या यशाचे श्रेय स्वत: पुस्तकांकडे केलेल्या दुर्लक्षाला दिले.
मग, प्राध्यापकवर्गात खूपच चुळबूळ सुरू झाली. अध्यापकांनी जगावे कसे? त्यांची पोटे भरावी कशी? समाजवादाच्या काळात महाविद्यालये निघत, ती सरकारी परमिटने; प्राध्यापकांचे पगार ठरत ते सरकारी समित्यांच्या अहवालांच्या शिफारशींप्रमाणे. अव्वाच्या सव्वा पगार वाढूनही प्राध्यापकांचे संप आणि आंदोलने चालूच आहेत. दिवस झपाट्याने बदलत आहेत. प्राध्यापक म्हणून नेमणूक होतानाच त्यांना खंडणी भरावी लागते. पगार पुरा क्वचितच हातात ठेवला जातो. कला आणि वाणिज्य महाविद्यालयांची संख्या घटत आहे. महाविद्यालयेच बंद पडतील काय अशी धास्ती सर्वांनाच पडली आहे.
काही वर्षांपूर्वी डॉ. वि.म. दांडेकर यांनी शिक्षणाच्या खासगीकरणासंबंधी एक प्रस्ताव मांडला होता: 'महाविद्यालयांची आवश्यकता नाही. ज्या त्या प्राध्यापकाने आपापला स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा, जे विद्यार्थी येतील त्यांना शिकवावे, स्वसंतोषाने जी देतील ती गुरुदक्षिणा, देतील त्यांत संतोष मानावा.' अर्थात्, हा प्रस्ताव प्राध्यापकांना मान्य होण्याची काही शक्यता नव्हती. गुणवत्ता आणि फलनिष्पत्ती दाखवून मेहनताना स्वीकारणे हे पांढरपेशांच्या प्रकृतीस जमणारे नाही!
दांडेकरांची पद्धती स्वीकरली गेली असती तर अर्थशास्त्राचे फारच थोडे प्राध्यापक पोट भरू शकले असते. त्यांतील एक रिकार्डो. ॲडम स्मिथच्या बरोबरीने विद्वत्मान्य असलेल्या रिकॉर्डोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लंडनच्या शेअर बाजाराचा अचूक अंदाज करून तो स्वत: पैसे गुंतवत असे. या उलाढालीत त्याने प्रचंड कमाई केली.
अंगारमळा । ५५