पान:अंगारमळा (Angarmala).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आला होता- आज नाणेशास्त्रात अर्थशास्त्रात जगभर शिखराची कीर्ती मिळवलेला आणि बहुधा येत्या काही वर्षांत नोबेल पारितोषिक मिळवण्याची निश्चिती असणारा जगदीश भगवती. कोठल्या अपघाताने कोणाच्या आयुष्याला कसे वळण लागेल कोणालाही सांगणे शक्य नाही. मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचा निश्चय जाहीर केला. केला म्हणजे केला, 'शेंडी तुटो पारंबी तुटो' आता माघार घेणे नाही.तोंडातून निघालेला शब्द मागे घेणे भाग पडून होणाऱ्या अपमानाने मलिन झालेले जीवन जगण्यात तरी काय अर्थ आहे?

 जीवेन किम् तत् विपरीत वृत्तेः । प्राणैहि उपक्रोष मलीमसै: वा॥

 मी मध्यमवर्गीय कारकुनाचा मुलगा. त्या वेळी मुंबईत वाणिज्य शाखेची दोन महाविद्यालये होती. एक फोर्टातील सिडनेहॅम आणि दुसरे माटुंग्याचे पोद्दार.सिडनेहम कॉलेजात मोठ मोठे उद्योगपती, गडगंज धनी, व्यापारी यांची मुले वंशपरंपरागत व्यवसाय पुढे नेण्याच्या मिषाने दोनचार वर्षे उल्लूपणा करण्याच्या बुद्धीने आलेली, त्यांचे विश्व वेगळे. महाविद्यालयात येताना दोन दिवस लागोपाठ तीच मोटारगाडी घेऊन येणे त्यांच्या जगात कुचेष्टेचा विषय होई.

 माटुंग्याच्या पोद्दार कॉलेजची परिस्थिती वेगळी. तेथे उच्चमध्यमवर्गीय मुलांचा भरणा अधिक. महाराष्ट्रातले थोडेफार वर आलेले उद्योगपती आपल्या मुलांना तेथे पाठवीत; पण बहुतेक पोद्दारवाशी विद्यार्थ्यांची महत्त्वाकांक्षा बँका, विमान कंपन्या, व्यापारी पेढ्या, कारखाने, त्या वेळी एका हाताच्या बोटावर मोजता येण्याइतक्या अल्पसंख्य बहुराष्ट्रीय कंपन्या यांत भरगच्च पगाराच्या नोकऱ्या मिळवण्याची. थोडी मेहनत केली असती तर पोद्दारच्या गटात अधिकच सहजतेने सामावू शकलो असतो; पण सिडनेहम ९०% पारशी, गुजराथी, मारवाडीबहुल. तिथला मराठी विद्यार्थी 'घाटी' मानला जाणारा; कपडे, राहणेसाहणे या सर्वच बाबतीत वेगळा दिसणारा.

 वर्ग सुरू झाले आणि 'हरियाली' सोडून 'पथरीला' रस्ता स्वीकारणाऱ्यांच्या वेदना क्षणाक्षणाला जाणवू लागल्या. 'रघुवंशा'तील इंदुमतीस्वयंवरात राजकन्या इंदुमती एका एका राजापुढे जात, ज्याच्या पुढे ती उभी राही त्या राजाचा चेहरा आशेने उजळून जाई. वेत्रवति सुनंदेने राजाची माहिती सांगितल्यानंतर, स्वारस्य न वाटल्याने, इंदुमति पुढे सरकली, की त्या मागे पडलेल्या राजाचा आशेने उजळलेला चेहरा व्याकुळतेने काळा पडे. या जगप्रसिद्ध उपमेकरिता कालिदास 'दीपशिखी कालिदास' म्हणून प्रसिद्ध आहे. साहित्याला धि:क्कारून वाणिज्यात शिरलो आणि आयुष्य असे वैराण, खडतर वाटू लागले. हिशेब ठेवण्याच्या पद्धती अभ्यासणे हा काय आयुष्याचा हेतू होऊ शकतो? व्यवसाय

अंगारमळा । ५२