पान:अंगारमळा (Angarmala).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करायला एक मालकी, भागीदारी, सहकारी, भागभांडवली कंपनी इ. पद्धतीच्या बांधणी असतात त्यांचा अभ्यास करायकरिता जगायचे?

 तेवढ्यात, अगदी तरुणसे प्राध्यापक आले. वर्णाने काळसर. भर वर्गातही काळा चष्मा घातलेले आणि इंग्रजी बोलताना ओढून ताणून आणलेला अर्धांग्ल थाट. यांच्याकडे तर ४५ मिनिटे पाहणे आणि यांचे बोलणे ऐकणे अशक्यप्राय आहे असे वाटू लागले; पण क्षणार्धात चमत्कार झाला.

 त्या अवताराकडे पाहून समोरच्या बाकावरील एक विद्यार्थी हसला असावा. हसणे मला ऐकू आले नाही; मात्र प्राध्यापकांचा आवाज वीज कडाडावी तसा ऐकू आला, 'वर्गात हसायचे असेल तर दात साफ ठेवत जा.' त्या विद्यार्थ्याचा चेहरा काही दिसला माही, पण भूमीने गिळले तर बरे अशी त्याची अवस्था झाली असणार. प्राध्यापकांनी त्यांच्या करड्या आवाजाचा सूर चालू ठेवला, "कोणा ऐऱ्यागैऱ्या कॉलेजात आला नाही. वाह्यातपणा करायचा असेल तर कला शाखेत जा, शास्त्रात जा आणि कोठेही जा; वाणिज्य हा गंभीर अभ्यास आहे. जे कोणी केवळ बँकेत किंवा पेढीवर कारकून होण्यासाठी म्हणून वाणिज्याकडे आले असतील त्यांनी आजच वेगळा मार्ग धरावा. सिडनेहॅम हे आशियातील सर्वांत पहिले आणि सर्वश्रेष्ठ वाणिज्य महाविद्यालय आहे. आम्ही कारकून आणि हिशेबनीस तयार करत नाही. येथे प्रवेश घेतलेला विद्यार्थी चार वर्षांत पदवीधर होताना सर्व भारताचा वित्तमंत्री होण्याचे ज्ञानाचे आणि बुद्धीचे गाठोडे जमा करतो. असा काही मानस असेल तर या अभ्यासक्रमात रहा, या महाविद्यालयात रहा, नाही तर आपला दुसरा मार्ग पकडा."

 प्राध्यापक महाशयांचा शिकवण्याचा विषय जाहिरातशास्त्र होता; म्हणजे फारसा गंभीर नाही. त्यांनी लगेच सूर बदलून आपल्या विषयाला सुरवात केली; पण त्यांच्या चार वाक्यांनीच माझी मन:स्थिती पार पालटून गेली. कालिदास, भवभूतीची संगत सोडल्याचा विषाद क्षणार्धात नाहीसा झाला आणि अर्थकारण, व्यापार यांसारख्या रूक्ष विषयात पाऊल टाकून, पाहिजे तितके परिश्रम करून, या साऱ्या क्षेत्रात जे काही घडत असेल त्याची पूर्णत: नस पकडण्याची महत्त्वाकांक्षा मनात तयार झाली.

 त्यानंतरच्या ६ वर्षांत पूर्वी संस्कृतचा अभ्यास करायचा, तसाच अर्थशास्त्राचा करायला घेतला. संस्कृतचा पेपर एक, त्याकरिता आवश्यक असलेली तयारी फार थोडी. पण तरीही बाणभट्ट, कालिदास, भवभूती, वाचण्याचा जिद्दीने प्रयत्न केला त्याच जिद्दीने अर्थशास्त्रासंबंधी जे मिळेल ते पुस्तक, अहवाल,मासिके बारकाईने अभ्यासण्याचा झपाटा लावला.

अंगारमळा । ५३