पान:अंगारमळा (Angarmala).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मर्यादित राहत नाही. तारुण्याच्या भरात शक्तीच्या अमदानीत उसळणाऱ्या नवनव्या ऊर्मीचे सार्थक करून दाखवण्याची झिंग तयार होते.६ जून १९५१ - एस.एस.सी.च्या परीक्षेचा निकाल लागला, मी शाळेत पहिला आलो. गुणांच्या याद्या मिळाल्या. आमच्या कंपूत 'आता पुढे काय?' याची चर्चा सुरू झाली. आकंठ जेवून तृप्त झालेल्याला रस्त्याकाठी बसलेल्या माणसाच्या पोटातील भुकेची जाणीव नसावी तसा, काही आढ्यतेने मी म्हणालो, 'पुढे कोणता शिक्षणक्रम घ्यायचा यात एवढा विचार करण्यासारखे काय आहे? कोणताही शिक्षणक्रम घेतला तरी फरक काहीच पडत नाही. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख, त्यावेळचे आमचे दुसरे चरित्रनायक, म्हणतात, 'आवडणारी गोष्ट कोणीही करेल; करावी लागणारी गोष्ट आवडीने करणे यात पुरुषार्थ आहे.' आपल्या लोकोत्तरतेच्या धुंदीत आपल्या हातानेच आपले आयुष्य कडू करून घेण्यात गोड मानणारे कितीतरी खांडेकरी नायक डोक्यात बिळे करून बसले होते.

 एका अत्यंत प्रिय मित्राने म्हटले, "तुला काहीच चिंता नाही. तुझे ठरलेच आहे, तू संस्कृत घेऊन एम.ए. करणार आणि प्राध्यापक होणार!" मी? विश्वाच्या निर्मितीतील एक प्रमुख प्रमेय असलेले माझे आयुष्य आणि हा कसेबसे ५४% मार्क मिळालेला मित्र मला माझी वाट सांगतो आहे? शब्दाशब्दाने वाद वाढला, 'प्राणापेक्षा प्रिय असलेल्या सीतेचा, राजधर्माचे परिपालन करण्याकरिता त्याग करायलाही मी मागेपुढे पाहणार नाही." अशा रामचंद्री अभिनिवेशात मी संस्कृत अभ्यासक्रम न घेण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. वर्षानुवर्षे ज्या आयुष्यक्रमाची तयारी केली, तो क्षणार्धात हेकटपणे लाथाडला, आता पुढे काय? आईवर रागावलेले बाळ हट्ट करून जेवायला नकार देते; त्यामुळे आईचे हृदय पिळवटते आहे या जाणिवेत त्याला काय आनंद होतो? लव-कुशांनी रामाच्या साऱ्या सैन्याचा पराभव केला. सीतेचे निष्कलंकत्व सिद्ध झाले. तिला कोणी पतिता म्हटले तर लवकुशांचे पराक्रमसिद्ध धनुष्यबाण आकर्ण ताणून सिद्ध झाले असते तरीही रामाने, 'सीतेने पुन्हा एकदा अग्निदिव्य करावे' असा आग्रह धरून मनातल्या मनात कोणत्या असीम कडूजहर सुखाचा अनुभव घेतला?

 संस्कृत नाही म्हणजे नाही; पण मग कोणता अभ्यासकम घ्यायचा? संस्कृत भाषेचे लालित्य, माधुर्य, सौंदर्य सोडून त्याच्या नेमक्या उलट्या टोकाचा नीरस, शुष्क, कठोर विषय कोणता घ्यावा? माझे त्यावेळचे संस्कृतचे आचार्य- आयुष्यात विविध कलांचा, गुणांचा, विद्यांचा त्यांच्याइतका व्यापक आणि सखोल आविष्कार करणारा मी आजपर्यंत माहिलेला नाही. १९५० सालच्या एस.एस.सी. परीक्षेत त्यांचा विद्यार्थी बोर्डात पहिला

अंगारमळा । ५१