पान:अंगारमळा (Angarmala).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रामो, मत्पिता रामचंद्र:' हा 'अनुष्टुप' लिहिला आणि मराठी मातृभाषिकाला संस्कृत ही आजीच आहे असे वाटावे असा बदल तासाभरात घडवून आणला. मग, जिद्दीने संस्कृतच्या परीक्षांना बसवणारे, सुभाषितकाव्यांचे पाठांतर करून घेणारे, सारी भगवद्गीता मुखोद्गत करून घेणारे शिक्षक भेटण्याचे भाग्य लाभले. बाणभट्टाची कादंबरी आणि नादमाधुर्याने तोंडाला सुटणारे पाणी सावरत सावरत तन्मयतेने शिकवणारे गुरुजीही भेटले. 'संस्कृत ही काव्याची भाषा आहे. संस्कृतमध्ये करायचे भाषांतर पद्यबद्धच झाले पाहिजे' असा आग्रह धरून पानेच्या पाने इंग्रजी उतारे सुबोध, नादमधुर काव्यात, पाण्याचा प्रवाह धो धो वाहावा तसे, सांगणारे आचार्यही भेटले.

 संस्कृतची गोडी किती लागली या प्रश्नाचे उत्तर आजही कठीण आहे; पण पुत्रप्राप्तीकरिता गाईपाठोपाठ फिरणारा दिलीप राजा, नारदाच्या तंबोऱ्यावरील फुलांची माळ कोसळल्याने मृत्यू पावलेल्या इंदुमतीबद्दल बाष्पगदगद होऊन विलाप करणारा अज राजा आणि सीताहरणानंतर दंडकारण्यातील झाडाझाडांना सीता कोठे आहे असे बेभानपणे विचारत फिरणारा राम या विश्वात, काही नाही तरी, वर्तमानातल्या असुखद वास्तवाच्या भानाची भूल पाडण्याचे सामर्थ्य हाते. ती एक धुंदीच होती, मस्ती होती. इतरांना ज्या क्षेत्रात रस नाही त्यात आपण आकंठ आनंदात बुडून जात आहोत याचा अहंकारही मोठा असावा. आयुष्यात जगण्यासारखे, करण्यासारखे, अभ्यासण्यासारखे, स्वत:ला झोकून द्यावे असे काही असेल तर ते म्हणजे संस्कृतचा व्यासंग अशी माझी पक्की धारणा झाली होती.

 काशीहून विद्या घेऊन आलेल्या रामला पेशवाईत हुकमी दक्षिणा मिळे. आता संस्कृत व्यासंग्याला भिक्षा मिळण्याचीही शक्यता फारशी नाही; पण त्या व्यासंगाची गोडीच अशी की 'फार काय, पोटात काटे भरावे लागतील एवढेच ना?' अशी अविचारी गुर्मीही होती. परीक्षेत चागले गुण मिळवले आणि दैवयोगे करून चांगल्या महाविद्यालयामध्ये संस्कृत भाषेचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली तर मग पोटापाण्याचाही प्रश्न फारसा राहत नाही. विद्वत्तापूर्ण व्यासंगाची जनमान्यता, सुखवस्तूपणे जगता यावे इतकी अमदनी आणि महाविद्यालयातील वर्गात तारुण्यात नुकतेच पदार्पण करू पाहणाऱ्या तरुणतरुणींना कुमारसंभवातले बारकावे समजावून सांगण्याचे काम! इतका काही सगळा बारकाव्याने विचार आखला गेला होता असे काही नाही; पण संस्कृतचा प्राध्यापक व्हायचे एवढे मनात ठामपणे ठरलेले होते.

 साहित्याच्या रसाची मस्ती चाखण्याचा अनुभव आला, की तो साहित्यापुरताच

अंगारमळा । ५०