पान:अंगारमळा (Angarmala).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एखादे ललित साहित्याचे पुस्तक घेऊन कोणत्याही विषयातले प्राध्यापक होतात. त्यातल्या त्यात मागास पूर्णवेळ कायद्याची पदवी संपादन करू पाहतात. एकदा वकिलीला लागला आणि बऱ्यापैकी पैसा मिळू लागला, की वैकुंठाची वाट धरेपर्यंत आपला व्यवसाय कुणी सोडत नाही. ज्यांची वकिली चालतच नाही ते वेगवेगळ्या तऱ्हांच्या खटाटोपींनी धागेदोरे जमवून मॅजिस्ट्रेट बनतात, पुढे चढत चढत न्यायाधीश बनतात, कालानुक्रमाने बिच काय सर्वोच्च न्यायालयातही न्यायाधीश बनतात.

 अलीकडे राजकारणी राज्यकारभाराचे काम करीत नाहीत, त्यामुळे न्यायाधीशांच्या हातीच सर्व सत्ता येऊ पाहत आहे. रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांना इंधन कोणत्या प्रकारचे वापरावे, दुचाकीवाल्यांनी डोक्यावर शिरस्त्राणे घालावी किंवा नाही, विद्यालयातील फिया काय असाव्यात येथपासून तर इतिहासात कोणत्या काळी कोठे देऊळ होते का मशीद होती इथपर्यंतचे सर्व निर्णय शैक्षणिक पात्रतेच्या सगळ्या चाळण्यांत गणंग ठरलेले करतात.

 कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आपण निव्वळ मातेऱ्यातून माणके तयार करतो याचा खरे पाहिले तर अभिमान वाटायला पाहिजे. हे मातेरे प्रवेश घेताना भरभक्कम 'हुंडा' देऊन येत नाहीत हेच खरे त्यांचे दु:ख असावे!

 ब्राह्मणी घरात वाढलेला मी, कोणत्याही शारीरिक कष्टाचा कंटाळा होता असे नाही, त्यात कमीपणा वाटे असेही नाही; पण, परमेश्वराने एवढे आयुष्य दिले आहे ते कारखाने काढणे, रोग्यांची शुश्रूषा करणे, कोर्टात वितंडवाद घालणे, सरकारी नोकरीत मान खाली घालून वर्षानुवर्षे काम कण्यात जाणे ही गोष्ट मोठी भयानक वाटे.

 तिसरीचौथीत असताना प्रभातचा 'रामशास्त्री प्रभुणे' हा सिनेमा पाहण्यात आला. हूड आणि निर्बुद्ध मानला गेलेला राम काशीला जातो. 'रामोहरि करी भूऽभृत' अशी घोकंपट्टी करतो; आणखीही काही घोकत असेल; पण सिनेमात एवढेच दाखवले आहे. एवढ्या आधारावर तो प्रकांड पंडित मानला जाऊन राजसत्तेलाही नमवण्याचा अधिकार प्राप्त करतो हे काही छान आहे; असे काहीतरी केले पाहिजे असे वाटे. आठवीत संस्कृतच्या तासाला 'राम: रामौ रामा:' कानावर आल्यावर आता आपला रामशास्त्री होणे काही काळाच्या अवधीचाच प्रश्न आहे असे वाटू लागले. नाशिकच्या शाळेतील आमचे संस्कृतचे गुरुजी... सर्वांना जड वाटणारा विषय इतका सुरस करून सांगणारा असा शिक्षक मी नंतर कधी पाहिलाच नाही. पहिल्याच दिवसापासून त्यांनी पाठांतर बाजूला ठेवून सर्वांनी संस्कृतात बोलले पाहिजे असा आग्रह धरला. फळ्यावर रामरक्षेतील 'माता

अंगारमळा । ४९